दात किडल्याने त्रास होतोय? मग घ्या अशी काळजी

दातांच्या आरोग्यासंबंधी एक मोठी समस्या म्हणजे दात किडणे. वरवर अगदी साधा वाटणारा हा त्रास वाढला तर खर्चात पाडू शकतो. कारण, दात किडल्यानंतर रूट कनालपासून ते दात काढणे आणि नंतर इम्प्लान्ट असा खर्च वाढू शकतो. त्यासोबत येणाऱ्या वेदना आणखी त्रासदायक असतात.

पण, या समस्येची सुरुवात अगदी लहानपणापासून होते. त्यामुळे या समस्येवर जितक्या लवकर तोडगा काढला जाईल तेवढं दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. कारण लहान मुलांचे दात जरी दुधाचे असले, पडून जाणार असले तरी त्यामुळे हिरड्या आणि नंतर येणाऱ्या नवीन दातांवर परिणाम होऊ शकतो. तसेच तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

लहान बाळांच्या दातांची काळजी –

अगदी लहान बाळांच्या हिरड्या स्वच्छ ठेवणे, त्यांनी काही खाल्ले, दूध प्यायले की त्यांचे तोंड स्वच्छ ठेवणे यामुळे येणारे दात निरोगी येतात. झोपताना दुधाची बाटली तोंडात ठेवून झोपायची सवय लावू नये. त्यामुळे बराच काळ दुधाचा किंवा त्यातील साखरेचे अंश तोंडात राहून तेथे जंतूंची लागण होऊ शकते. लहान लहान दात यायला लागले की बाळांचे दात पालकांनी बोटात घालायचा मऊ ब्रश मिळतो, त्या ब्रशच्या मदतीने साफ करावेत. काहीही खाऊ घातल्यावर किंवा दूध प्यायल्यावर हे करावे. त्यामुळे मुलांना अगदी नकळत्या वयापासून दातांच्या स्वच्छतेची सवय लागते.

वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून मुलांना स्वतःच्या हाताने दात घासायला शिकवावे. मुले साधारण 8 ते 10 वर्षांची होईपर्यंत त्यांच्या ह्या सवयीकडे लक्ष द्यावे लागते. मग त्यांची त्यांना सवय लागून ह्या गोष्टीचे महत्त्व देखील लक्षात येते. म्हणजे मग मुले आयुष्यभर दात स्वच्छ ठेवण्यास शिकतात आणि पुढे होणाऱ्या दाताच्या समस्या कमी होतात.

दातांचे आरोग्य –

दातांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून नियमित दंतवैद्यांना भेट देऊन आपले दात तपासत राहणे आवश्यक आहे. लहानपणापासून म्हणजे अगदी मूल 1 वर्षाचे झाले की दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला की पुढे येऊ शकणाऱ्या दातांच्या समस्या टाळता येतात. तसेच मुलांमध्ये वेडेवाकडे येणारे दात, किडलेल दात, अंगठा/बोटे चोखणे ह्यासारख्या सवयी ह्यावर वेळीच सल्ला मिळू शकतो. दातांच्या डॉक्टरकडे वर्षातून किमान दोन वेळा जाणे ही सवय मोठेपणीही ठेवावी म्हणजे पक्के दात, दाढा व्यवस्थित येणे, पुढे उद्भवणाऱ्या दातांच्या समस्या न येणे ह्यासाठी मदत मिळू शकते.

आपल्या दातांवर एनॅमलचे आवरण असते ज्यामुळे दातांचे संरक्षण होत असते. फ्लोराईड ह्या घटकद्रव्यामुळे ह्या दातांच्या आवरणाचे म्हणजेच टुथ एनॅमलचे संरक्षण केले जाते. हे फ्लोराईड दातातील अन्नकण (प्लाक) आणि लाळेत मिसळून दातांचे रक्षण करते. म्हणून दातांचे डॉक्टर फ्लोराईड युक्त टुथपेस्ट वापरण्याचा सल्ला देतात. तसेच फ्लोराईड युक्त जेल आणि माऊथ वॉश मिळतात ते वापरण्याचा सल्ला देतात. त्यामुळे दात चांगले राहण्यास मदत होते.

दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असणारे पदार्थ म्हणजेच चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे, चहा, कॉफी, यांचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात करावे. तसेच मद्यपान, धूम्रपान, तंबाखू खाणे हे अत्यंत हानिकारक असून ते अजिबात करू नये. आपला टुथब्रश दर 2 ते 3 महिन्यांनी बदलावा. तसेच फार मऊ किंवा फार कडक ब्रिसल्स असणारा ब्रश वापरू नये. नेहेमी चांगल्या प्रतीचा ब्रश व पेस्ट वापरावी.