
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेकडून धोकादायक झाडे छाटण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असताना खासगी जागांवरील झाडे छाटण्यास टाळाटाळ होत असल्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत असल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणानंतर खासगी हद्दीतील चार हजार झाडे तोडण्यासाठी फेबुवारीमध्ये नोटीस दिल्यानंतर अद्याप तब्बल एक हजार झाडे धोकादायक स्थितीत उभी आहेत. त्यामुळे झाड पडून होणाऱया दुर्घटना थांबणार कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
झाड पडून मृत्यू झाल्याची एका महिन्यात तिसरी घटना सोमवारी घडल्यामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील एकूण २९ लाखांवर झाडांपैकी १ लाख २२ हजार झाडे रस्ताच्या दुतर्फा, उद्यानांमध्ये आहेत. तर १५ लाख झाडे खासगी जागेवर आहेत. तर उरलेली झाडे शासकीय हद्दीत आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाकडून फेब्रुवारीपासूनच झाडांचे सर्वेक्षण करण्यात येते. यामध्ये पालिकेची जबाबदारी असलेली १ लाख २२ हजार झाडांपैकी ८८ हजार झाडे तर खासगी जागेवरील चार हजार झाडांची छाटणी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट झाले होते. यामधील पालिकेने ८८ हजार झाडांची छाटणी १ जूनपर्यंत पूर्ण केली, मात्र खासगी हद्दीतील झाडांबाबत नोटीस दिलेल्या चार हजारपैकी केवळ तीन हजार झाडांची छाटणी करण्यात आली आहे. या बेजबाबदारपणामुळे अतिवृष्टीत झाडे कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१७ दिवसांत ५८७ दुर्घटना
जूनच्या १ तारीखपासून पालिकेची जबाबदारी असलेल्या क्षेत्रात झाड पडल्याच्या ४६ घटना तर खासगी क्षेत्रात १५३ घटना घडल्या. तर फांद्या कोसळल्याच्या घटना खासगी क्षेत्रात ३५२ तर पालिका हद्दीत १८२ घटना घडल्या. यामुळे खासगी क्षेत्रात घडलेल्या दुर्घटना ५३४ तर पालिका क्षेत्रात घडलेल्या दुर्घटना १९९ मिळून एकूण ६४३ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रात धोकादायक झाडांची छाटणी योग्य प्रकारे होत नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर खासगी आस्थापनांनी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी पावसाळय़ाआधीच धोकादायक झाडांची छाटणी करावी, असे आवाहन उपायुक्त किशोर क्षीरसागर यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांतील घटना
-जून २०१७ मध्ये कुलाबा नेव्ही नगरमध्ये एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
-१ जुलै २०१७ रोजी ४५ वर्षीय रिक्षा ड्रायक्हर राजाराम यादव यांच्या बोरिवली येथे रिक्षावर झाड कोसळून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
-२२ जुलै २०१७ रोजी दूरदर्शन अँकर असलेल्या कांचन नाथ यांचा चेंबूरमध्ये नारळाचे झाड अंगाकर पडून मृत्यू झाला.
-७ डिसेंबर २०१७ रोजी ४५ वर्षीय शारदा घोडेस्वार यांचा चेंबूरमध्ये गुलमोहराचे झाड अंगावर पडून मृत्यू झाला.
-एप्रिल २०१८ मध्ये दादरमध्ये झाड अंगावर पडल्याने दिनेश सांगळे व्यक्तीचा मृत्यू झाला.
-२९ मे रोजी वाळकेश्वर येथे झाडाची फांदी पडून लीला गोकुळदास सुखी (९१) यांचा मृत्यू.
-९ जून रोजी दहिसरमध्ये दृष्टी मुंगरा (१४) या मुलीचा झाड अंगावर पडल्याने मृत्यू.
-१८ जून रोजी अंधेरी येथे झाडाची फांदी अंगावर पडून यश देसाई (५०) यांचा मृत्यू.



























































