‘आरएसएस’चे नवे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नवीन सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची शनिवारी निवड झाली. बंगळुरूत अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या वार्षिक बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते भैयाजी जोशी यांची जागा घेणार आहेत.

सरसंघ संचालक मोहन भागवत यांच्यानंतर सरकार्यवाह हे संघातील दुसरे महत्त्वाचे पद आहे. सन 2009 पासून हे पद भैयाजी जोशींकडे होते. भैयाजींकडे नवीन जबाबदारी सोपवली जाणार आहे. 73 वर्षीय भैयाजी यांनी सरकार्यवाह म्हणून प्रत्येकी तीन वर्षांच्या चार टर्म पूर्ण केल्या आहेत. होसबळे हे आतापर्यंत संघाचे सह-सरकार्यवाह म्हणून कार्यरत राहिले. दरवर्षी नागपुरातील संघ मुख्यालयात पार पडणारी प्रतिनिधी सभा यंदा कोरोनामुळे पहिल्यांदाच बंगळुरूत पार पडली.

कोण आहेत होसबळे?

दत्तात्रेय होसबळे हे मूळचे कर्नाटकचे. 1955 मध्ये शिमोगा जिह्यातील सोराब गावात संघाशी संबंधित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले व ते बंगळुरूत आले. पुढे म्हैसूर विद्यापीठातून इंग्रजी साहित्य विषयात एमएची पदवी घेतली.

वयाच्या 13 व्या वर्षी ते संघ परिवाराशी जोडले गेले. 4 वर्षे स्वयंसेवक म्हणून काम केल्यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय झाले. 15 वर्षे परिषदेचे महामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नेतृत्वशैलीची छाप पाडली.