नववर्षाच्या स्वागताला वन डेला गुडबाय; वॉर्नरचा क्रिकेटप्रेमींना धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाच्या सर्व क्रिकेटचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने नववर्षाचे स्वागत करताना क्रिकेटप्रेमींना शुभेच्छा देण्याऐवजी चक्क धक्का दिला. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱया सिडनी कसोटीनंतर कसोटीतून निवृत्त होत असलेल्या वॉर्नरने नववर्षाचे वेलकम करताना वन डे क्रिकेटला गुडबाय करण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. मात्र त्याने आपण ऑस्ट्रेलियासाठी टी-20 क्रिकेट पुढेही खेळत राहणार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, 2025 साली होणाऱया चॅम्पियन्स करंडकासाठी ऑस्ट्रेलियन संघाला माझी गरज असेल तर मी उपलब्ध असेन, असेही तो म्हणाला.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला वन डे क्रिकेटचे सहाव्यांदा जगज्जेतेपद मिळवून देताना डेव्हिड वॉर्नरने सिंहाचा वाटा उचलला होता. आज त्याने सिडनीच्या कसोटीला मैदानात उतरण्यापूर्वी वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे वन डे वर्ल्ड कपचा अंतिम सामना त्याच्या वन डे कारकीर्दीचा अखेरचा सामना ठरला आहे. आज पत्रकार परिषदेत वॉर्नरने आपल्या वन डे निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. मी वर्ल्ड कपपूर्वीच हिंदुस्थानात विजय मिळवा, असे म्हटले होते. तोच विजय माझ्यासाठी सर्वात मोठा माइलस्टोन ठरला आहे. त्यामुळे मी वन डेतूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या निवृत्त होण्यामुळे नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळेल आणि मलाही जगभरातील लीगमध्ये खेळण्याचा पुरेपूर आनंद लुटता येईल. आता लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफीचेही आयोजन केले जाणार आहे. जर मी पुढील दोन वर्षे दमदार क्रिकेट खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियन संघाला माझी गरज भासल्यास मी निवडीसाठी उपलब्ध असेन, असेही वॉर्नर पत्रकार परिषदेत म्हणाला.

वॉर्नरची 22 शतके, 33 अर्धशतके
क्रिकेट विश्वातील स्पह्टक फलंदाज म्हणून लौकिक असलेल्या वॉर्नरच्या नावे दोन वर्ल्ड कप आहेत. ज्यात 2023 च्या वर्ल्ड कपचाही समावेश होतो. नुकत्याच झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. डावखुऱया वॉर्नरने 2009 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट येथे आपला पदार्पणाचा वन डे सामना खेळला होता. त्याने 161 सामन्यांत 45.30 च्या सरासरीने 6932 धावा केल्या आहेत. यात 22 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. तो ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे, तर सर्वाधिक शतके ठोकण्याचा यादीत रिकी पॉण्टिंगनंतर त्याचाच नंबर लागतो. वॉर्नरच्या तुलनेत पॉण्टिंग 205 सामने अधिक खेळला आहे. बुधवारपासून सुरू होणारी सिडनी कसोटी वॉर्नरची शेवटची आहे. आतापर्यंत तो 111 कसोटी खेळला असून त्याने 8695 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने 26 शतके आणि 36 अर्धशतकेही ठोकली आहेत.

ते प्रकरण वेगळय़ा पद्धतीनेही हाताळले जाऊ शकले असते…
2018 साली केपटाऊन कसोटीत खिशात सॅण्डपेपर सापडल्याने डेव्हिड वॉर्नरवर एक वर्षासाठी बंदी लादण्यात आली होती. तसेच त्याला आजीवन ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करता येणार नसल्याची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. आपली अखेरची कसोटी खेळण्यापूर्वी त्याने या प्रकरणाची आठवण काढली. मी जेव्हाही या प्रकरणाकडे मागे वळून पाहतो तेव्हा नेहमीच एक गोष्ट जाणवते, हे प्रकरण आणखी वेगळय़ा पद्धतीने हाताळता आले असते. मला जी शिक्षा दिली ती कठोर होती. मी कर्णधारपदावर लादलेली आजीवन बंदीविरोधात कोर्टात जाणार होतो, पण नंतर मी तो निर्णय बदलल्याचे वॉर्नरने सांगितले.