सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला; जानेवारीपासूनची थकबाकीही मिळणार

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 1 जानेवारीपासूनची सहा महिन्यांची थकबाकीही जुलैच्या वेतनाबरोबर रोखीने देण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचार्‍यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता देण्यात येतो. 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी हा निर्णय जाहीर करण्यात येतो. राज्य सरकारने बुधवारी काढलेल्या आदेशात 1 जुलैपासून चार टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आल्याचे म्हटले आहे. शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना हा महागाई भत्ता देय असून तो सहा महिन्यांच्या थकबाकीसह मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगातील रचनेनुसार सध्या 46 टक्के महागाई भत्ता देण्यात येतो. जुलैपासून तो 50 टक्के होणार आहे. यापूर्वी 1 जानेवारी 2023 आणि 23 नोव्हेंबर 2023 रोजी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. 1 जानेवारी 2024 रोजी ठरल्याप्रमाणे महागाई भत्ता वाढला नाही. तो आता जुलैमध्ये वाढवून देण्यात आला आहे.