48 तासांत 16 जणांचा अकस्मात मृत्यू, नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

नाशिक शहरात कोरोनाचे सावट कायम असतानाच गेल्या काही दिवसांपासून अकस्मात मृत्यू होणाऱयांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रेणेची झोप उडाली आहे. बुधवारी नऊ जणांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना कायम असताना गुरुवारी श्वास घेण्यास त्रास झाल्याने आणि छातीत दुखू लागल्याने तब्बल सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या 48 तासांत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून अचानक होणाऱया या मृत्यूंमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, गुरुवारी मृत्यू झालेल्यांमध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

नाशिकमधील काठे गल्लीतील प्रकाश किशनशहा परळकर (70) व पेठरोडच्या भास्कर बाबूराव गांगुर्डे (55) यांचा बुधवारी छातीत दुखून मृत्यू झाला. तोरणानगर येथील आंद्रेश श्रीपती घोरपडे (65) यांचा पोटात दुखून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मृत्यू झाला. सातापूरच्या उर्मिला रवींद्र शास्त्री (49) यांचा छातीत दुखून अशक्तपणे, अशोक नगरच्या संगीता सुरेश पाटील (45) यांचा खोकल्याचा तसेच श्वास घेण्यास त्रास झाल्याने, तर रविवार पेठेतील लीला मनोहर सुर्वे (60) यांचा बेशुद्ध होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पाथर्डी येथे शितल अशोक कर्डक (25) या गर्भवती महिलेचा अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊन मृत्यू झाल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी दिली.

दुखणे अंगावर काढू नका

अगोदरच कोरोनामुळे नाशिकमध्ये आरोग्य यंत्रेणवर ताण असतानाच गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये या घटनांमुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, आरोग्यासंदर्भातील कोणतेही दुखणे अंगावर काढू नये, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या