मुस्लिम आमदाराने घेतली संस्कृतमध्ये शपथ! भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष लढवली होती निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानाचे मुस्लिम आमदार युनूस खान यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भारतीय जनता पक्षानं तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवत जिंकली सुद्धा.

निवडणुकींची रणधुमाळी संपली निकाल लागले आणि राजस्थानच्या 16व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन बुधवारी बोलावण्यात आले. हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या (प्रोटेम स्पीकर) अध्यक्षतेखाली सर्व नवनिर्वाचीत आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. या शपथविधी दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते दिडवाना मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष आमदार युनूस खान यांनी. युनूस खान यांनी संस्कृत भाषेत शपथ घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

राजस्थानच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नावाचा दबदबा आहे. युनूस खान हे वसुंधरा राजे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. दिडवाना मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज युनूस खान यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अपक्ष निवडणूक लढवली आणि 70 हजार 952 मते मिळवत त्यांनी बाजी मारली. युनूस खान यांनी कॉंग्रेसच्या चेतनसिंग चौधरी यांचा 2 हजार 392 मतांनी पराभव केला. तसेच, याच जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जितेंद्र सिंह यांना 22 हजार 138 मतांनी पराभव करत धूळ चारली.

युनूस खान यांनी निवडणुक जिंकल्यानंतर देशोक येथील करणी मातेच्या चरणी नतमस्तक होतं आशीर्वाद घेतला होता. यूनूस खान यांच्याबरोबर दुसरे आमदार जुबेर खान यांनी सुद्धा संस्कृत भाषेत शपथ घेतली. राजस्थानच्या विधानसभेत आज 13 आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली असून 8 आमदारांचा शपथविधी अजून बाकी आहे.