
नवी दिल्लीमध्ये एक आश्चर्यरकारक घटना घडली आहे. दी़ड वर्षाचा मुलगा साबणाने भरलेल्या वॉशिंग मशीनमध्ये पडला आणि जवळपास 15 मिनीटे तो तसाच पडून होता. पण बोलतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असेच काहीसे या मुलाच्या बाबतीत घडले आणि त्याचे प्राण वाचले आहेत.
दिल्लीत साबणाने भरलेल्या वॉशिंगमशीनमध्ये दीड वर्षाचा मुलगा पडून पंधरा मिनीटे तसेच पडून होता. त्यानंतर त्याला सात दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मुलावर दिल्लीच्या वसंत कुंज येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याला जेव्हा आणले होते त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत होता आणि थंड पडला होता आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. एवढेच नाही तर त्याचे शरीर निळे पडले होते. हृदयाचे ठोके मंद होते.
आईच्या म्हणण्यानुसार, मुलगा मशीनचे झाकण उघडून जवळपास 15 मिनिटे टॉप लोडिंग वॉशिंग मशीनमधील साबणाच्या पाण्यात पडला होता. त्या खोलीतून बाहेर गेल्या तोपर्यंत हा मशीनमध्ये पडला. जेव्हा ती परत आली तेव्हा तो कुठेच दिसेना. मुलगा खुर्ची घेऊन मशीनवर चढला होता आणि कदाचित तेव्हाच तो पडला. मुलावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मूल 15 मिनिटांपेक्षा कमी काळ मशीनमध्ये होते, अन्यथा तो वाचला नसता.
बालरोगतज्ज्ञ डॉ. हिमांशी जोशी यांनी सांगितले की, मुलाला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. साबणाच्या पाण्यामुळे त्याचे अनेक अवयव काम करणे बंद झाले होते. त्याला केमिकल न्यूमोनिया देखील झाला होता ज्यामध्ये फुफ्फुसात जळजळ होते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे त्याला बॅक्टेरियल न्यूमोनियाही झाला. यानंतर त्याला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनही झालं होतं.
मुलाच्या उपचारासाठी अॅण्टीबायोटिक आणि फ्लूड सपोर्ट दिला ज्याने त्याच्या तब्येतीत थोडा सुधार होऊ लागला. हळूहळू तो त्याच्या आईला ओळखू लागला आणि मग त्याचे व्हेंटिलेटर हटवण्यात आले. तो लहानमुलांच्या आयसीयूमध्ये सात दिवस राहिल्यानंतर त्याला वॉर्डमध्ये शिफ्ट केले जिथे तो बारा दिवस राहिला. मुलाच्या मेंदूचा सीटीस्कॅन करण्यात आला ज्यात सध्या काही अडथळा दिसत नाही. मुलावर अजूनही उपचार सुरु आहेत.






























































