
लांबच्या प्रवासाला निघायचं असलं की, आवश्यक वस्तूंची जमवाजमव करावी लागते. वस्तूंची यादी तयार करून खरेदीला बाहेर पडावे लागते. त्यासाठी वेळात वेळ काढावा लागतो. प्रत्येकाकडे खरेदीसाठी पुरेसा वेळ असेलच असे नाही. हीच समस्या ओळखून दिल्लीच्या सिमरन सिंह या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने ट्रव्हल किट तयार केले आहे. प्रवासात लागणाऱया लहानसहान वस्तूंचे हे किट आहे.
सिमरनने दोन पद्धतीचे सेफ्टी किट्स तयार केले आहेत. एक मुलांसाठी आणि दुसरे महिलांसाठी. प्रत्येक किटमध्ये आवश्यक औषधे, फेस मास्क, टायलेट सीट कव्हर्स, पेपर सोप, कॉटन बॉल्स, अँटिसेप्टिक आदी गोष्टी आहेत. महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या किटमध्ये सॅनिटरी पॅड्स, डिस्पोजेबल युरिनेशन फनल, पेपर स्प्रे आणि अलार्म ठेवले आहे. प्रवासादरम्यान मुले कंटाळतात. त्यांच्यासाठी ओरिगामी पेपर, स्केच पेन, चाकलेट आदी वस्तूही तिने ठेवल्या आहेत. येत्या काळात ज्येष्ठांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी किट तयार करण्याचा तिचा विचार आहे.
सिमरनला ट्रव्हल किट तयार करण्याची प्रेरणा आईबाबांमुळे मिळाली. सिमरनचे आईबाबा जेव्हा लांबच्या प्रवासाला जायचे, तेव्हा आवश्यक वस्तूंची खरेदी करायला त्यांच्याकडे वेळ नसायचा. आईबाबांची ही समस्या बघून टॅव्हेल किटचे डिझाईन तयार करण्याची कल्पना सुचली, असे सिमरन सांगते.



























































