दिल्लीतील परिस्थिती होतेय बिकट! नर्सिंग होम्स, खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित

गेल्या 24 तासांत 25 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळल्याने राजधानी दिल्लीतील कोरोना संक्रमण स्थिती अत्यंत भयावह आणि आरोग्य व्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीत आता 100हून कमी आयसीयू बेड शिल्लक असल्याचे आज सांगितले.

दिल्ली सरकारने खासगी नर्सिंग होम्स आणि खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवावेत, असे आदेश आज दिले. याचसोबत कुंभमेळ्याहून परतणाऱया दिल्लीतील भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन अनिवार्य असेल, असे जाहीर केले आहे. याशिवाय सुमारे 5000 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल, यादृष्टीने दिल्लीतील दोन रेल्वे स्थानकांवर रेल्वे कोचेस तैनात करावेत, अशी मागणी सरकारने केली आहे.

दिल्लीतील कोरोना टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट गेल्या दिवसभरात 24 टक्क्यांवरून थेट 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांची संख्या 24,375 झाली असून, तब्बल 167 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील हॉस्पिटल्समध्ये आता 100हून कमी आयसीयू बेड्स शिल्लक आहेत.

ऑक्सिजनची उपलब्धता कमी होत आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दिल्ली सरकार पुढील दोन ते तीन दिवसांत यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, राधास्वामी सत्संग बियासचे आवार आणि शाळांमध्ये 6000 ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता करणार आहे. यापूर्वी दिल्लीत 20 हजारांखाली रुग्ण होते, असे केजरीवाल म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या