
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकडे चांगलेच चवताळले आहेत. या एअर स्ट्राईकमध्ये शेकडो दहशतवादी ठार झाल्याने जैशचे मनुष्यबळही कमी झाले आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी खैबर येथील पश्तूनख्वा प्रांतातील पश्तून नागरिक व आदिवासी नागरिकांची वेगळी सेना तयार केली आहे. या सेनेवर हिंदुस्थानी सीमारेषेवरून घुसखोरी करणे , दहशतवादी हल्ले घडवून आणणे अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधीही कश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानने स्थानिकांना एकत्र आणत ‘कबायली’ नावाची सेना बनवली होती.
पाकिस्तानने 1947 साली जम्मू-कश्मीरवर आक्रमण करण्यासाठी या कबायली घुसखोर सेनेचा उपयोग केला होता. त्यावेळी तेथे राजा हरि सिंह यांचे राज्य होते. या कबायली घुसखोरांनी कश्मीरमध्ये घुसखोरी करत हाहाकार उडवला होता. त्यानंतर राजा हरि सिंह यांनी आपल्या लष्कराला पाठवून या घुसखोरांना हुसकावून लावले होते.
दरम्यान पाकिस्तान नेहमीच नागरिकांना युद्धात सहभागी होण्याचे आवाहन करतो. तो त्याचा इतिहासच आहे. यामुळेच हिंदुस्थानच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैनिक पुन्हा एकदा लोकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन करत आहे. यातील आदिवासी व पश्तून लोकांना आत्मविश्वासात घेत त्यांनी त्यांची एक वेगळी सेना बनवली आहे. हिंदु्स्थानच्या सीमेवरून घुसखोरी करणे, शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम ही सेना करणार आहे.



























































