
दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातून अनेक वकिलांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या वकिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील अॅडव्होकेट सुमिता हजारिका यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून बार असोसिएशनने थेट सरन्यायाधीशांकडे धाव घेतली आहे.
Detained lawyers at Yamuna Sports Complex https://t.co/BSgvmsJOag
— Bar and Bench (@barandbench) October 10, 2026
सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात तसेच वकिलांच्या चेंबर्सजवळ काही वकिलांना पोलिसांनी अडवले आणि त्यानंतर त्यांना चिलखती वाहनातून घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी जवळपास 100 वकिलांना ताब्यात घेऊन यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे हलवल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या वकिलांचा समावेश आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या वकिलांची नेमकी संख्या स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही.
वकिलांना ताब्यात घेण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या कारवाईबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिल्याची माहितीही उपलब्ध नाही. मात्र बार आणि बेंचने आपल्या एक्स अकाऊंटवर याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच कारवाईत सहभागी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर नावाचे बिल्ले नसल्याचे समोर आले आहे.
Police clash with lawyers marching for Jantar mantar protest https://t.co/JuvcxMh7a1
— Bar and Bench (@barandbench) October 10, 2026
दरम्यान, या घटनेवर बार असोसिएशनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. बार असोसिएशनने सरन्यायाधीश सूर्य कांत यांना तातडीने पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पोलिसांनी शांततापूर्ण मार्गाने जाणाऱ्या वकिलांवर बळाचा वापर करून त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. ही बाब अत्यंत गंभीर असून सरन्यायाधीशांनी स्वत: याची दखल घ्यावी असे बार असोसिएशनने पत्रात म्हटले.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतील डीएन पोलीस ठाण्यात राडा


























































