तुरुंगात फळं आणि भाज्यांचे सॅलड मिळत नसल्याने सत्येंद्र जैन यांची न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. जैन हे दिल्लीतील आप सरकारमधील मंत्री आहेत. जैन यांची तिहार तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा भाजपने सातत्याने आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात भाजपने काही व्हिडीओ प्रसिद्ध करत जैन हे तुरुंगात मसाजचा आनंद घेत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सत्येंद्र जैन यांनी आपल्याला तुरुंगात थोडा त्रास होत असल्याचं म्हणत न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला जेवणात फळं आणि भाज्यांचे सॅलड मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सत्येंद्र जैन यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये म्हटलंय की त्यांना “जैन आहार” मिळत नाहीये. आपल्याला मंदिरात जाण्याचीही परवानगी मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मंदिरात गेल्याशिवाय शिजवलेले अन्न खायचे नाही अशी धार्मिक परंपरा आहे, ज्याचे सत्येंद्र जैन हे पालन करतात. सत्येंद्र यांनी केलेल्या याचिकेत म्हटलंय की मंदिरात जायला मिळत नसल्याने त्यांना फळं आणि कच्च्या भाज्यांचे सॅलड खावे लागते. मात्र ते देखील मिळत नसल्याने आपली आबाळ होत असल्याचे जैन यांनी याचिकेत म्हटले आहे. जैन यांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जेलमधल्या मसाजच्या व्हिडीओमुळे खळबळ
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांना तुरुंगात सर्व सोईसुविधा मिळत असल्याचा दावा ईडीने यापपूर्वी कोर्टात केला होता. ईडीचा दावा खरा असल्याचे म्हणत भाजपने सातत्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने हे आरोप करण्यासाठी काही व्हिडीओंचा आधार घेतला होता. तिहार जेलमधील सीसीटीव्हीची ही दृश्ये असून यामध्ये जैन यांना मसाज दिला जात असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये त्यांच्या कोठडीत काही मंडळी जैन यांच्याशी गप्पा मारत असून एक व्यक्ती त्यांच्या पायांना तेलाने मसाज करत असल्याचं दिसत आहे.

आम आदमी पक्षाने या व्हिडीओंबाबत दिलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की सत्येंद्र जैन यांच्यावर अॅक्युप्रेशन पद्धतीने उपचार सुरू असून त्यासाठी त्यांनी न्यायालयाची परवानगी घेतली आहे. सत्येंद्र जैन हे दिल्लीचे आरोग्यमंत्री असून त्यांच्यावर कोलकात्यातील एका कंपनीसोबत हवालाद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती ज्यामध्ये त्यांना 2 कोटींपेक्षा अधिकची रक्कम आणि 1.8 किलो सोनं मिळालं होतं. ही छापेमारी करण्यापूर्वी ईडीने जैन यांच्या 4.81 कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या.

जैन यांच्यावर आरोप आहे की त्यांनी दिल्लीमध्ये बोगस कंपन्या बनवल्या आणि त्या आधारे जवळपास 16.91 कोटींचा काळा पैसा सफेद केला होता. सत्येंद्र जैन याच्यावर तिहार तुरुंगात घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यानेही आरोप केले होते. तुरुंगात चांगल्या सोईसुविधांसाठी मी सत्येंद्र जैन यांना महिन्याला 2 कोटी रुपये देत होतो असं सुकेश याने नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.