ताडी व्यावसायिकांनाही पार्सलची मुभा द्या! ताडी उत्पादक संघटनेची मागणी

पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आर्थिक कणा मोडलेले ताडी उत्पादक हवालदिल झाले आहेत. कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या लादलेल्या निर्बंधांचे ताडी उत्पादकांनी स्वागत केले आहे. मात्र या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने ताडी पार्सल देण्याची सुविधा मिळावी,अशी मागणी ताडी उत्पादक संघटनेने उत्पादन शुल्क आयुक्तांकडे केली आहे.

पालघर जिल्ह्यात पालघर, डहाणू, तलासरी आदी तालुक्यांमध्ये ताडी सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्याचे काम ताडी उत्पादक करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे उत्पादक मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून या व्यवसायाला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ताडी व्यवसायामुळे हजारो मजूर आणि त्यांच्या कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कोरोना प्रतिबंधक उपायोजनांमध्ये थेट ताडी विक्री करण्यास १ मेपर्यंत बंदी घातली आहे. यामुळे ताडी उत्पादक हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये ताडी उत्पादकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे अनेकांनी ताडी उत्पादन बंद करून नोकरीची वाट धरली. याचबरोबर गेल्या वर्षी परवाना शुल्क भरल्यानंतरही दुकाने बंद राहिली. त्यामुळे हजारो उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर आता शासनाने पुन्हा निर्बध घातल्यामुळे व्यावसायिक हतबल झाला आहे. इतरांप्रमाणे ताडी व्यावसायिकांना ही पार्सल सेवा सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी संघटनेने राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडे केलेली आहे.

पालघर जिल्ह्यातील ताडी व्यवसायामुळे मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. सहकार क्षेत्राला त्यामुळे उभारी मिळाली आहे. निर्बंधांमुळे ताडी व्यवसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. या सर्वांचा शासनाने विचार करुन त्यांना दिलासा द्यावा.

या आहेत अडचणी

ताडी व्यवसाय हा सर्वस्वी निसर्गावर अवलंबून आहे. ताडा-माडापासून ताडी काढण्याची प्रक्रिया थांबवली तर पुन्हा त्या झाडाला ताडी येण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे ताडी काढणाऱ्यांचे नुकसानच होत असल्याने या व्यवसायाला परवानगी मिळावी, अशी मागणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या