नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करा! शिक्षण विभागाकडून निर्णयाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा न घेता पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी पात्र करण्याचा निर्णय कधी घेतला जाईल याविषयी राज्यातील पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात नववी आणि अकरावीत शहरी भागात शिकणाऱया विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता ग्रामीण भागातील नववीच्या लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. तर मुंबई आणि परिसरात नुकतेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्यापही अकरावीचा अभ्यासक्रम काही महाविद्यालयांत सुरू झाला नाही. तर राज्यात सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने त्याचा मोठा फटका शिक्षणाला बसला आहे. त्यामुळे या विद्यार्थांना पुढील वर्गात प्रवेश मिळण्यासाठी प्रमोट केले जावे, अशी मागणी केली जात आहे.  शालेय शिक्षण विभागाकडून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांना पात्र ठरवले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली. यात आतापर्यंत ज्या शाळांनी काही परीक्षा अथवा तशी काही तयारी केली का, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून त्यासाठी लवकर निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.