
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदारसंघात पदवीधर निवडणूकीत भाजपचा पराभव झाला. हा पराभव देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागाला आहे. फडणवीसांनी नागपूर येथे एका सभेत बोलताना त्यांनी भाजपची देखील काँग्रेस सारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
”आता हवा आहे. हवेवर मतं मिळतील. नितीनजींचं काम आहे, मोदींजीचं काम आहे. महाराष्ट्रात सरकार आहे. आता मतं मिळतील पण हळू हळू कमी होत जातील. काँग्रेस पक्षाचा ऱ्हास असाच झाला. काँग्रेस पक्ष नेत्यांचा पक्ष झाला आणि नंतर कागदावरचा पक्ष झाला. मला भीती आहे की नागपूर शहर भाजप हा नेत्यांचा पक्ष होतोय. अजून एवढी वाईट स्थिती नाहीए. पण हि स्थिती जर बदलली नाही तर हिच स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
”मी गृहमंत्री आहे कोण काय करतंय हे सगळं मला समजत असतं. आपल्याला आपली कार्यपद्धती बदलावी लागेल. आज आपले जे नगरसेवक आहे. जे माजी आहेत त्यांना आजी व्हायचंय. त्यांच्यापैकी अनेकांचा व्यवहार हा असा आहे की ते आजी होऊ शकणार नाही. आपल्याला कुणाची तिकीटं कापायची नाहीत. पण आपण मालक आहोत अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. काही लोकं नेत्यांची माणसं आहेत. पक्षाशी घेणदेणं नाही. असं कसं चालेल. शेवटी पक्ष आहे म्हणून आपण आहोत. आपल्याकडे मतं कुणाची आहेत. हे सगळं बदलायची गरज आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.





























































