
पॅरालिम्पिकमध्ये तीन वेळा पदके जिंकणारा भालाफेकपटू देवेंद्र झाझरीया, माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि माजी जगज्जेती बॉक्सर एल. सरिता देवी यांचा या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही समिती काही दिवसांत बैठक घेऊन पुरस्कार विजेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील.
उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मुपुंदकम शर्मा या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष असतील. या समितीवर माजी ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत व महिला क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांचाही समावेश आहे. याचबरोबर हॉकी प्रशिक्षक बलदेव सिंग, हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाचे (साई) महासंचालक संदीप प्रधान, वरिष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली व विक्रांत गुप्ता यांचाही या निवड समितीमध्ये समावेश आहे. क्रीडा मंत्रालयातील एका सर्क्युलरने ही माहिती दिली.




























































