
संगमेश्वरमधील देवरूख नजीकच्या पाटगाव लिंगायतवाडीतील सचिन लिंगायत (39) या तरूणाने बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सचिन हा तालुक्यातील नामांकित लोककलावंत होता. सचिनच्या आत्महत्येने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचा 8 वर्षांपुर्वी घटस्फोट झाला होता. तेव्हापासून तो सतत टेन्शनमध्ये असायचा. भाऊ महेश याच्यासोबत तो राहत होता. मात्र बुधवारी दुपारी घरात कोणीही नसल्याची संधी साधत सचिनने घराच्या खोलीतील लाकडी भालाला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. याबाबतची माहिती सचिनचा चुलत भाऊ प्रदिपने देवरूख पोलीस ठाण्यात दिली.
यानंतर देवरूख पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. देवरूख पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार संतोष सडकर करीत आहेत. दरम्यान, सचिन याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवल्याने त्याच्या मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.



























































