देवरुखजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार; तीन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी मार्गावर किरदाडी फाटा येथे ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शंभू ईश्वर पासवान (मूळ रा. बिहार) असे मृताचे नाव आहे. आंबव येथून साईटवरून सिमेंटची पोती ट्रॅक्टरमध्ये भरून (MH-09 U- 3766) हा ट्रँक्टर पूर येथे येत होता. ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीमध्ये सिमेंटच्या पोत्यांवर चौघेजण बसले होते. ट्रॅक्टर किरदाडी फाटा येथील उतारात आला असता वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरील चालक रामनाथ सिंह याचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाला.

ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर ट्रॉलीमध्ये बसलेले कामगार बाहेर फेकले गेले. तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील सिमेंटची पोती शंभू ईश्वर पासवान याच्या अंगावर पडल्यामुळे तो पोत्यांखाली दबला गेला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.