
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा सरकारी धोरणांनी व्यथित झाला आहे. दिग्रस तालुक्यातील दिग्रस दारव्हा महामार्गावरील गांधीनगर फाट्यावर या भूमिपुत्रांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतमालाला भाव नसल्याने तसेच पिकविमा कंपनी अग्रिम रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने मोख, गांधीनगर, आनंदवाडी, रामगाव परिसरातील संतप्त शेकडो शेतकरी पुत्रांनी शनिवारी सकाळी 9 वाजता रस्त्यावर उतरत तब्बल तीन तास दिग्रस दारव्हा महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान वाहतूक खोळंबल्याने दिग्रस, पुसद, नांदेड, उमरखेड, दारव्हा,नागपुर, अमरावती अशा दोन्हीकडे जाणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दिग्रस तालुका हा मुळात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा मतदारसंघ आहे. त्याच मतदार संघातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मतदार संघातीलच शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर जिल्ह्यातच पालकमंत्री इतर मतदार संघातील शेतकऱ्यांना काय न्याय देतील असा प्रश्न या शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, पिकविम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा व्हायला पाहिजे. हिवाळी अधिवेशनमध्ये कोणत्याही लोककप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली नाही. त्यामुळे कापूस सोयाबीनच्या भावावर ठोस निर्णय झाला नाही. तसेच पीक विमा कंपनीने थातूरमातूर नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली. काही शेतकऱ्यांना तर अडीच रुपयांपासून पासून पन्नाश शंभर रुपयांची नुकसानभरपाई दिल्याने शेतकरी वर्ग प्रचंड संतापला आहे. त्याचा पर्यवसान म्हणून शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला. आंदोलन दरम्यान “जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम्, इंकलाब जिंदाबाद” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी गांधीनगर, मोख, आनंदवाडी, रामगाव परिसरातील भुमिपुत्रांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जर येत्या आठ दिवसांत कापसाला बारा हजार रुपये भाव, तुरीला दहा हजार रू भाव व सोयाबीनला सात हजार रूपये भाव तसेच पिकविमा मिळाला नाही तर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा वसंत प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल चव्हाण, मांगिलाल, चव्हाण, पवन आडे, माधव राठोड आदींनी दिला. यावेळी रामेश्र्वर, गोपाल जाधव, अमोल, लवकुश, सुमित, सचिन, नितीन आडे, प्रवीण माळवे, सिदू आडे, तसेच गांधीनगर, मोख, आनंदवाडी, रामगांव येथील शेतकरी पुत्र व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी झाले.


























































