
- दिलीप देशपांडे
5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करून, समस्या जाणून घेऊन पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करणे हाच पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू आहे.
आपल्याला स्वस्त निरोगी आणि प्रदूषणमुक्त आयुष्य जगायचे असेल तर आजूबाजूचे पर्यावरण नेहमी स्वच्छ असणे आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने दरवर्षी प्रयत्न केले जातात. शासकीय/प्रशासकीय पातळीवर दिवस साजरा होतोच. एक प्रश्न सतत मनात येतोच, की असे दिवस साजरे करून पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे का? पर्यावरणाचा ऱहास का होतो, त्याला आपण किती जबाबदार आहोत, निसर्गातील बदल, अनियमितपणा किती कारणीभूत आहे याचाही विचार करावा लागेलच.
खरं म्हणजे, पर्यावरण आणि प्रदूषण यांचा खूप जवळचा संबंध आहे. अनेकविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे पर्यावरणाचा ऱहास प्रामुख्याने होत असतो. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो, याचा विचार करणे गरजेचे आहे. निसर्गनिर्मित कारणांमुळे होणाऱ्या कारणावर आपण काय करणार? ती एक प्रकारची आपत्तीच असते, पण आपल्याकडून ज्या ज्या कारणांमुळे प्रदूषण निर्मिती होते ती आपण नक्कीच कमी करू शकतो. 2022 ची थीम आहे ‘केवळ एक पृथ्वी’ अशी आहे (ओन्ली वन अर्थ). अर्थातच आपण जिथे राहतो ती पृथ्वी एक आणि एकच आहे. म्हणून सगळ्यांनीच पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पृथ्वीवरील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण होणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. हाच यामागील हेतू आहे. पर्यावरणाचा ऱहास मुख्यत्वे प्रदूषणाने होतो. प्रदूषण कोणकोणत्या मार्गाने कसे कसे होते आणि कोणामुळे होते ते पाहू. वायुप्रदूषण/हवेतून होणारे. ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे, प्लॅस्टिक कचरा, वातावरणातील बदलाने निर्माण होणारे पर्यावरण अर्थातच निसर्गनिर्मित प्रदूषण.
अनेक कारखाने आहेत, त्यांच्या निर्मिती प्रक्रियेतून वायू, धूर, निर्मिती होत असते. बऱ्याच वेळी हा वायू आरोग्यासाठी हानीकारक तर असतोच, पण त्यामुळे सभोवतालचे वातावरण दूषित होते. वाहनांची संख्या खूप वाढली आहे. जुनी वाहने, वेळीच सर्व्हिसिंग न होणारी वाहने खूपच धूर सोडतात. त्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, वाहन तपासणी होते, पोल्युशन प्रमाणपत्र बंधनकारक आहे, पण कुठेतरी या दोन्हीही प्रक्रियेत काहीतरी दोष आहेत. त्यात सुधारणा हवी आहे.
एका विशिष्ट मर्यादेपलीकडे निर्माण झालेला असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. कारखान्यातील यंत्रांचे आवाज, वाहनांचे कर्कश्य हॉर्न, सायलेन्सरविना चालणाऱ्या गाडय़ा, वाहने, मर्यादेपलीकडे डेसिबलने वाजणारे डीजेचे कर्कश्य आवाज कारणीभूत ठरतात व त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड, निर्माण होते.
कारखान्यातील निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणारे रसायनेमिश्रित दूषित पाणी, नद्या, नाले, तलावात सोडले जाते. ते आजूबाजूच्या परिसराला त्रासदायक ठरते. आजूबाजूला पाण्याचे स्रोत असतील तर ते दूषित होतात, ते पाणी पिऊन मोठय़ा प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडतात. आजूबाजूच्या विहिरीचे पाणी दूषित होते. बऱ्याच मोठय़ा शहरात सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित नसते, ते एक कारण आहेच.
प्लॅस्टिकचा कचरा, जुनी इलेक्ट्रिक उपकरणे फेकून दिली जातात, ते नष्ट होत नसतात. प्लॅस्टिक पिशव्या वापरावर बंदी येऊनही सर्रास वापर सुरू आहे. आपल्याला तर ते घातक आहे, तसे जनावरांनाही. तो खाऊनही हजारो जनावरे मृत्युमुखी पडतात, पशुधन नष्ट होते. रस्त्याच्या दुतर्फा पडलेले कचऱ्याचे ढीग आपण पाहतोच. याबाबतीतही कडक धोरण अवलंबून कारवाई व्हायला हवी आहे. निसर्गातील, अर्थातच वातावरणातील बदलाचा पर्यावरणाचा समतोल ढासळण्यावर मोठा परिणाम होतो. आपण शहराच्या सुशोभनासाठी, वाहतूक मार्गासाठीही अशीच हजारो वृक्षांची कत्तल करतो. प्रत्येकाने एक वृक्ष लावण्याचा, जगवण्याचा संकल्प करायला हवा.
पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची काही मानवनिर्मित, तर काही निसर्गनिर्मित कारणे आहेत. अनेक नवे शोध, त्यामुळे जीवनात सुख आले असे म्हटले जाते. अनेक मोठमोठय़ा इमारती उभ्या राहिल्या, कारखाने उभे राहिले. परिणामी, खूप मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली आणि त्याचाच एक परिणाम पर्यावरणावर झाला. मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढून पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याला आपणच पायबंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर सहज शक्य आहे, पण तेच होत नाही. अनेक अभियान राबवले जात आहेत, जसे प्लॅस्टिक पिशवी मुक्ती अभियान, स्वच्छता अभियान, अधिक कडकपणे राबवायला हवे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळ, गावोगावच्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांनी तसेच अभियानाची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे, त्यांनी आपले कर्तव्य, जबाबदारी आत्मीयतेने पार पाडली तर हे सहज शक्य आहे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करायलाच हवी, ती कोणी करावी हे नक्की करायला हवे. त्यात ‘तू तू मै मै’ नको. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला आणि वृक्षारोपण करण्याकडे लक्ष दिले, वृक्षतोड थांबवली तर पर्यावरणाचा समतोल राखणे अतिशय शक्य आहे आणि एवढीच गोष्ट आपण करायला हवी आहे. यानिमित्ताने आपण ती करावी. त्यातच आपल्या सगळ्यांचं हित आहे हे वेगळे सांगायला नको. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मागील-पर्यावरण दिनाच्या दिवशी विनंती केली होती, ‘येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेऊ. आपण सारेच या वसुंधरेचे सेवक आहोत याचे भान ठेवू या. आपण कितीही प्रगती केली तरी निसर्गाची ताकद अफाट आहे याची प्रचीती येत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पर्यावरणस्नेही म्हणून जगू या आणि वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करू या.’
पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे याचे भान सगळ्यांनीच ठेवायला हवे हे मात्र यानिमित्ताने नक्कीच सांगावेसे वाटते. पर्यावरणाचा समतोल राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे.



























































