दिव्यांग बॅडमिंटनपटू आरतीला हवाय मदतीचा हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

19 वर्षीय दिव्यांग बॅडमिंटनपटू आरती पाटील हिने आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी करीत आपली धमक दाखवून दिली आहे.

आता तिला मार्च महिन्याच्या अखेरीस दुबई येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. त्यानंतर स्पेन व आयर्लंड येथे होणाऱया स्पर्धेतही तिला हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करायचे आहे. पण या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे.

आरती पाटील सध्या ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. ठाणे महापालिका क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी तिला जिमची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. आरतीचा जन्म बेळगावमध्ये झाला व ती सुरुवातीला कोल्हापूर येथे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत होती. जन्मापासूनच ती डाव्या हाताने अपंग असल्यामुळे तिला खेळासाठी संपूर्णपणे उजव्या हातावर अवलंबून राहावे लागते, परंतु या जन्मजात वैगुण्यामुळे आरतीने अजिबात हार मानली नाही. सध्या ती पॅरा-बॅडमिंटन जागतिक फेडरेशनच्या महिला एकेरी क्रमवारीत 14 व्या स्थानावर आहे.

सध्याच्या घडीला आरतीकडे राज्यस्तरीय 2 सुवर्ण पदके आणि राष्ट्रीय स्तरावर 12 स्पर्धांमध्ये 10 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कास्य पदके आहेत. आरतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत 3 मानाची पदके पटकावली आहेत ज्यामध्ये 2017 सालच्या एशियन साऊथ पॅरा गेम्स, दुबईमधील रौप्य, 2018 सालच्या व्हिक्टर डेन्मार्क पॅरा-बॅडमिंटनमधील कास्य पदक, 2019 मधील युगांडा पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनलमधील कास्य पदकाचा समावेश आहे.

सध्या आरती खूप कष्टात दिवस काढते आहे. रोज 5 ते 6 तास कसून सराव करून ती स्वतः हाताने स्वयंपाक बनवते. शिवाजीनगर येथील एका छोटय़ा खोलीत ती भाडेकरू म्हणून राहत आहे. अशा या गुणी पण आर्थिकदृष्टय़ा अत्यंत बिकट परिस्थितीत असणाऱया आरतीला श्रीकांत वाड यांनी ठाण्याच्या बॅडमिंटन ऍकॅडमीमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. येत्या 27 मार्च रोजी ती दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.