
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट आणि रोहित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून बाहेर जावं, अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांच्या एका विधानावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित अजून बच्चा असल्याचं म्हटलं होतं. याला उत्तर देताना ‘बच्चे मन के सच्चे’ असं म्हणत अजित पवारांसाठी मी बच्चाच आहे. कारण ते माझे काका आहेत. पण अजितदादा नेहमी सगळ्यांच्या वयावर बोलतात, कधी ते मला बच्चा म्हणतात तर कधी ते पवार साहेबांचं वय झालं म्हणतात. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाहीत. काही वर्षांत मोदी 80 वर्षांचे होतील, मग त्यांनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे अशी म्हणण्याची हिम्मत त्यांच्यात आहे का? असा खरमरीत सवाल रोहित पवार यांनी केला.





























































