
सामना ऑनलाईन। बीजिंग
या जगात कुत्र्यासारखा इमानदार प्राणी दुसरा कोणीही नाही. जीवाला जीव देणारा व प्रसंगी मालकाचा जीव वाचवण्यासाठी जीव घेणारा प्राणी म्हणून कुत्रा ओळखला जातो. अशाच एका इमानदार कुत्र्याचा मनाला चटका लावणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमधला हा व्हिडीओ आहे. यात एक कुत्रा गेल्या काही दिवसांपासून एका रस्त्यावर ठराविक वेळी न चुकता येत असल्याचं दिसत आहे. तासन् तास तो रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीमध्ये आपल्या मालकाला शोधतोय. पण त्याचा मालक मात्र त्याला दिसत नाहीये. कारण 80 दिवसांपूर्वीच 21 ऑगस्टला त्याच ठिकाणी रस्ते अपघातात मालकाचा मृत्यू झाला आहे. पण कुत्र्याला मात्र ते माहित नाहीये.
चीनमधील इनर मोंगोलियातील हॉह़त परिसरातला हा व्हिडीओ आहे. आता या कुत्र्याला सगळेजण ओळखू लागले आहेत. हा कुत्रा ऑफिसला गेलेल्या मालकाची रोज याच रस्त्यावर वाट पाहात बसायचा. मग घराकडे परतताना मालक या ठिकाणी गाडी घेऊन यायचा. त्यानंतर कुत्रा त्याच्या बाजूला बसायचा व दोघे घरी जायचे. त्यांचा हा दिनक्रम अनेक वर्षांपासून सुरू होता. कुत्र्याचे मालकावरचे प्रेम बघून अनेकजण त्यांच कौतुक करायचे. पण 21 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच काम आटोपून मालक कुत्र्याला नेण्यासाठी या रस्त्यावर येत असताना त्याच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की मालकाचा जागीच मृत्यू झाला. पण कुत्रा मात्र त्याची आजतागयत वाट पाहतोय. त्याचाच हा व्हिडीओ आहे.





























































