पशुधन पर्यवेक्षक डॉ. हेगाजी-पाटील निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

नाधवडे पशुधन पर्यवेक्षक डॉ. शिवानंद रामगौडा हेगाजी-पाटील यांना मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे. शेण गोळा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पशुधन पर्यवेक्षक डॉ. हेगाजी-पाटील यांच्या वैभववाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जानेवारी रोजी घडली होती. यावेळी त्याने मुलीला या दुष्कृत्याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार उघड होताच जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी वैभववाडी येथे भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली होती. त्यांनी जिल्हा प्रशासनाला डॉ. हेगाजी-पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांना निलंबित केले आहे.