भगवद्गीता, ज्ञानेश्वरी समजत नाही तोपर्यंत विज्ञान कळणार नाही! – डॉ. विजय भटकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

आजच्या युगात माणूस ज्या सर्व गोष्टी करू शकतो त्या संगणकही करू शकतो. पण विज्ञान कितीही पुढे गेले तरी त्याच्या एक पाऊल पुढे हे अध्यात्म आहे. म्हणूनच आधुनिक जगातही वैज्ञानिक सृष्टी चालवणाऱ्या त्या चैतन्याचा शोध घेत आहेत. जोपर्यंत हे वैज्ञानिक ज्ञानेश्वरी, भगवद्गीता समजून घेत नाहीत तोपर्यंत त्यांना खरे विज्ञान समजणार नाही, असे प्रतिपादन महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी आज केले.

वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने दिला जाणाऱ्या ‘वारकरी रत्न’ पुरस्काराने विजय भटकर, ‘हैबतीबाबा वारकरी सेवाभूषण पुरस्कारा’ने कायदेतज्ञ ऍड. बी.एल. छाजेड तर दै. ‘सामना’च्या वतीने ‘समाज प्रबोधन’ पुरस्काराने गहिनीनाथ औसेकर यांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, ह.भ.प. दादा मोरे, ह.भ.प. अरविंद महाराज, ह.भ.प. रामदास बळी, खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील शिंदे, स्वाभिमानी रिपाइं पक्षाचे मनोज संसारे, शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, दै. ‘सामना’चे नॅशनल हेड (विपणन विकास) दीपक शिंदे, आदी उपस्थित होते. या वेळी आमदार अजय चौधरी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचेही आभार मानण्यात आले.

वारकरी धर्म हाच वैश्विक धर्म
जगात अनेक धर्म आहेत. पण जर असा कोणता धर्म असेल तो विश्वधर्म होऊ शकेल तर तो वारकरी आहे. सगुण-निर्गुण दोघांनाही वारकरी धर्म मानतो आणि सर्वांचा समन्वय घडवून आणतो, असे सांगतानाच भटकर यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वारकरी सांप्रदायाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

वारकरी समाज जगात मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करतो – संजय राऊत
वारकरी समाजाचं एक वेगळंच महत्त्व आहे. आज महाराष्ट्र अखंड आहे तो हा अध्यात्माचा पाया मजबूत आहे त्यामुळेच. मराठीची भगवी पताका आज फडकत असेल तर ती वारकऱ्यांमुळेच. हा वारकरी समाज जगात मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करतो, असे प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. वारकरी हा कधीच स्वतःसाठी काही मागत नाही. शिवसेना वारकऱ्यांच्या पाठीशी आहे. ‘डाऊ’ कंपनीविरोधातील आंदोलनकर्त्या वारकऱ्यांवरील खटले अद्याप मागे घेतले गेले नाहीत. सरकारने मागील चार वर्षांत राजकीय कार्यकर्त्यांवरील अनेक गुन्हे मागे घेतले. त्याप्रमाणे या वारकऱ्यांवरील गुन्हेही तत्काळ मागे घ्या, असे ते म्हणाले.

विठुरायाच्या सोहळ्याने मुंबापुरी दुमदुमली
श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने सलग 19व्या वर्षी काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याने मुंबापुरी दुमदुमली. कॉटनग्रीन ते पाच उद्यान अशा मार्गाने निघालेल्या या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती वीणा, टाळांचा गजर आणि मुखात ‘रामकृष्ण हरी’चा जप अशा निघालेल्या या दिंडीने वातावरण भक्तिमय झाले. या दिंडीची सांगता पाच उद्यान येथे साकारलेल्या भव्य रिंगणाने झाली. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीत सहभागी होता न येणाऱ्यांनी ही पंढरपूरची वारी ‘याची देही याची डोळा’ मुंबईत अनुभवली.

दिंडय़ांना टाळाची भेट
वारकरी प्रबेधन महासमितीच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन समाजातील मान्यवरांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे दिंडय़ांचाही सत्कार करण्यात आला. मागील वर्षी सहभागी दिंडय़ांना पखवाज भेट देण्यात आले होते. यंदा या दिंडय़ांना दहा टाळ भेट देण्यात आले. पुढील वर्षी याही पुढे जाऊन वारकऱयांतील वीणाधारकांना वीणा भेट दिल्या जातील, असे आश्वासन ह.भ.प. रामेश्वर शास्त्री यांनी दिले.