
सामना प्रतिनिधी । बीड
अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम इंद्रायणी कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळालेले आहे. 6 महिन्यांपूर्वी कामाचा कार्यारंभ आदेश मिळूनही इंद्रायणी कन्स्ट्रक्शनला भुयारी गटारचे काम नगराध्यक्ष श्री भारतभूषण क्षीरसागर यांच्या उद्घाटनाचा नारळ फोडण्याच्या हौसेपाई चालू करता आलेले नाही. उद्घाटन कार्यक्रमामुळे शहराला वेठीस धरण्याचे काम केले जात आहेत असा आरोप नगर सेवक अमर नाईकवाडे यांनी केला आहे.
बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वेळोवेळी भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यासंदर्भातआघाडीच्या नगरसेवकांनी मागणी करूनही नगराध्यक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बीड शहर अस्वच्छतेच्या खाईत लोटले गेले आहे, बीड शहराची स्वच्छता फक्त डिजिटल बॅनर वर दिसून येते प्रत्यक्षात नाही. शहर स्वच्छतेवर आठ कोटीचा विशेष निधी खर्च करूनही शहर आहे त्याच परिस्थितीत आहे. निधी फक्त कागदावर खर्च करण्यात येत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष. भारतभूषण क्षीरसागर यांना दिनांक 28 डिसेंबर 2018 रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण बीड शहर भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण ठेव तत्वावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केलेले आहे. योजनेचे कार्यारंभ आदेश दिनांक 19 जुलै 2018 रोजी पारित करण्यात आलेले असून देखील अद्याप आपण विहित नमुन्यातील करारनामा केलेला नाही व योजनेसाठी आवश्यक तीन जागा अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात दिल्या नाहीत. योजनेचे ठेकेदार इंद्रायणी कन्स्ट्रक्शन गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे काम चालू करण्याबाबत पाठपुरावा करत आहे. ठेकेदाराची यंत्रणा व मनुष्यबळ कामाविना बसून आहे.
नगराध्यक्ष श्री भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत अभियंत्यांनी चर्चा केली असता भूमिपूजन करूनच काम चालू करावे असे नगराध्यक्षांनी बजावले. तीन ते चार वेळा उद्घाटनाच्या तारखाही दिल्या परंतु दिलेल्या तारखेत काम चालू केले नाही. त्यामुळे कामास विलंब होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवेळी काम चालू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करूनही काम सुरू होत नाही कामाला जास्त विलंब होत असल्यामुळे विलंबाची जबाबदारी नगराध्यक्ष व बीड नगरपरिषदेची राहील,तसेच भुयारी गटार योजनेचे काम तात्काळ चालू करण्यात यावे अशा आशयाची विनंती देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्राच्या शेवटी केलेली आहे. नगराध्यक्ष बीड शहरावर कशाचा सूड उगवत आहेत? यासाठीच नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून त्यांना शेवटची संधी हवी होती का? असा प्रश्न नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी उपस्थित केला आहे.



























































