देखणे न देखणे – बिंदू ते रेषा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मीनाक्षी पाटील
[email protected]

चित्रकलेतील सर्वांत प्राथमिक घटक बिंदू ही अवकाशातील अस्तित्वाची पहिली खूण. तर रेषा म्हणजे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत झालेली हालचाल. स्थिर प्रतिमेत रेषेमुळे गतिमान काळाची जाणीव निर्माण होते आणि सोबतच चित्रातील अवकाशाने काळाची संकल्पना अधिक सूक्ष्म होते.

चित्रकला ही दृश्य माध्यमातून अनुभव व्यक्त करणारी कला आहे. शब्दांप्रमाणे तिची भाषा ध्वनीवर, संगीताप्रमाणे स्वरावर किंवा नाटय़ाप्रमाणे अभिनयावर आधारलेली नसून तिचे मूलभूत माध्यम आहे-दृश्यता. बिंदू, रेषा, आकार, रूप, रंग, पोत, प्रकाश-छाया, प्रमाण, लय, संतुलन, गती आणि अवकाश हे तिच्या दृश्य भाषेचे मूलभूत घटक आहेत. या घटकांच्या परस्परसंबंधातून चित्राची रचना घडते; परंतु या घटकांचा केवळ तांत्रिक साधने म्हणून विचार केला तर चित्रकलेच्या अनुभवात्मक स्वरूपाचा एक महत्त्वाचा भाग दुर्लक्षित राहू शकतो. कारण या प्रत्येक दृश्यघटकाच्या मागे अवकाशाची आणि काळाची जाणीव कार्यरत असते.

चित्रकलेतील सर्वांत प्राथमिक घटक म्हणून बिंदू पाहिला तर तो अवकाशातील अस्तित्वाची पहिली खूण ठरतो. एका रिकाम्या पृष्ठभागावर उमटलेला बिंदू ‘इथे काहीतरी आहे’ असे सांगतो. एका बिंदूच्या तुलनेत दुसरा बिंदू निर्माण झाला की त्यांच्यात अंतर निर्माण होते आणि त्या अंतरातून अवकाशाची सुरुवात होते. या दोन बिंदूंना जोडणारी रेषा निर्माण झाली की अवकाशाला दिशा प्राप्त होते. त्यामुळे रेषा ही केवळ आकाराची सीमा नसून ती अवकाशातून जाणारी हालचाल आहे. सरळ रेषा, वक्र रेषा, तुटक रेषा, गतिमान रेषा असा प्रत्येक रेषेचा अवकाशीय आणि कालिक परिणाम वेगळा असतो.

रेषांपासून आकार आणि आकारांपासून रूप निर्माण होते. चौकोन, वर्तुळ, त्रिकोण किंवा अनियमित आकार यांना चित्रात स्थान मिळाले की अवकाश अधिक स्पष्ट होतो. मात्र आकारांच्या प्रमाणातील बदल, त्यांचे एकमेकांवरील आच्छादन, आकारमानातील फरक आणि प्रकाश-छाया यांच्या सहाय्याने सपाट पृष्ठभागावर खोलीचा आभास निर्माण होतो. म्हणजेच द्विमितीय चित्रपृष्ठावर त्रिमितीय अवकाशाची निर्मिती होते. खरे तर रेषेतच एक प्रकारचा काळ दडलेला असतो. रेषा म्हणजे एका बिंदूपासून दुसऱय्य्य्या बिंदूपर्यंत झालेली हालचाल. म्हणून रेषा पाहताना आपण तिच्या निर्मितीची कल्पना करतो. चित्रात ती स्थिर दिसत असली तरी तिच्यामागे घडलेली हाताची हालचाल सूचित होते. अशा प्रकारे स्थिर प्रतिमेत रेषेमुळे गतिमान काळाची जाणीव निर्माण होते. तसेच ‘अवकाश’ म्हणजे केवळ चित्राच्या चौकटीत दिसणारी जागा नव्हे तर चित्रातील वस्तू कुठे आहे, तिचे दुसऱया वस्तूशी अंतर किती आहे, ती पुढे आहे की मागे, वर आहे की खाली, मध्यभागी आहे की कडेला या सर्वांचा संबंध अवकाशाशी आहे. याबरोबरच काहीवेळा चित्रातील रिक्त जागादेखील खूप अर्थपूर्ण असते व ती अनंत असे अर्थ व्य्यक्त करू शकते. त्यामुळे चित्रातील अवकाश हा ‘भौतिक’ तसेच ‘मानसिक’ अवकाश असतो. याच ठिकाणी काळाची संकल्पनाही अधिक सूक्ष्म होते. एखाद्या चित्रात एखादा क्षण पकडायचा प्रयत्न केला आहे असे वरकरणी वाटले तरी त्या चित्रात टिपलेल्या क्षणासोबतच त्या क्षणाच्या आधी आणि नंतर घडणाऱया असंख्य घटनांची कल्पना प्रेक्षक करू शकतो. त्यामुळे खरे तर वरवर स्थिर भासणाऱया चित्राच्या चौकटीत काळाची शक्यता निर्माण झालेली दिसू शकते. याचाच अर्थ चित्रात व्यक्त होणारा ‘काळ’ हा काही प्रत्यक्ष घडय़ाळाच्या काटय़ांप्रमाणे दिसत नाही; तरीही चित्रातील घटना, हालचाल, बदल, पुनरावृत्ती, क्रम, स्मृती आणि क्षण यांमधून काळाची जाणीव निर्माण होते.

चित्रातील अवकाश हा नेहमीच बाह्य जगाची नक्कल करणारा नसतो. चित्रकार स्वतच्या अनुभवानुसार अवकाश व्यक्त करत असतो. चित्रात एखादी व्यक्ती तिच्या प्रत्यक्ष आकारापेक्षा मोठी दाखवली जाऊ शकते. कारण चित्रकाराला त्यातून अधिक काही सुचवायचे असते. येथे अवकाशाची ‘वस्तुनिष्ठ नक्कल’ आणि ‘अनुभवाधिष्ठित, अर्थाधिष्ठित अवकाश’ यांतील फरक महत्त्वाचा ठरतो. बऱयाचदा चित्रकाराला प्रत्यक्ष दृश्यातील आकारमान, अंतर आणि प्रमाण जसेच्या तसे दाखवणे आवश्यक वाटत नाही, तर त्याच्या चित्रविषयानुसार त्यांचे आकारमान बदलू शकते. उदाहरणार्थ, अजिंठय़ाच्या चित्रांमधील पद्मपाणी बोधिसत्त्व असो की मध्ययुगीन युरोपीय आणि बायझंटाईन शैलीतील अनेक चित्रांमध्ये Madonna किंवा Christ यांना इतर व्यक्तींपेक्षा मोठे दाखवलेले दिसते. याचे कारण म्हणजे त्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी त्यांचा चित्रातील आकार हा प्रत्यक्ष शारीरिक आकारापेक्षा अधिक मोठा रंगवलेला दिसतो.

अवकाशनिर्मितीत रंगदेखील महत्त्वाची भूमिका निभावतात. उष्ण आणि शीत रंग, गडद आणि फिकट रंग, पारदर्शकता आणि अपारदर्शकता यांमुळे काही रंग पुढे येतात, काही मागे जातात. प्रकाश-छायेमुळे वस्तूला घनता आणि खोली प्राप्त होते. त्यामुळे रंग आणि प्रकाश हे केवळ सौंदर्यनिर्मितीचे घटक नसून अवकाशाची अनुभूती घडविणारी साधने आहेत. चित्रकलेचा इतिहास पाहिला तर आदिम गुहाचित्रांपासून आधुनिक अमूर्त आणि समकालीन डिजिटल कलेपर्यंत कलाकारांनी अवकाश आणि काळ यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधला आहे. कुठे ‘अवकाश’ हा अनुभवाचे दृश्य क्षेत्र बनतो, तर कुठे ‘काळ’ हा स्मृती, हालचाल किंवा परिवर्तनाचा अनुभव बनतो. चित्रकलेतील काळ व अवकाशाचं हे नाटय़ पाहूया पुढील लेखांमधून !

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)