
मासे खाल्ल्यावर दूध पिऊ नये असे आपल्याकडे म्हटले जाते. मासे खाल्ल्यावर दूध प्यायल्याने शरीरावर कोड उठते. अद्याप या आजारावर कोणताही उपचार नसल्याने कोड या आजाराला लोकं दचकूनच असतात. अचानक विद्रूप होत चाललेलं शरीर व त्यामुळे होणारे मानसिक खच्चीकरण याने ती व्यक्ती अधिकच खचते. त्यामुळे आपल्याकडे अद्याप माशांवर दूध पिणे, मासे दुधात शिजवणे, माशांच्या रस्स्यात दूधाचा वापर करणे हे प्रकार होत नाहीत. मात्र पाश्चिमात्य देशात माशांपासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये सर्रास दूधाचा वापर केला जातो.

आपल्या देशात जरी दूध व माशांबाबत असा भयंकर समज असला तरी डॉक्टरांचे याबाबत मत वेगळेच आहे. डॉक्टरांच्या मते अंगावर कोड उठणं याचा दूध व माशांशी संबंध नाही. विटीलिगो एक ऑटोइम्युन आजार आहे. या आजारात इम्यून सिस्टिम त्वचेतील मेलॅनिन विरोधातील अँटी बॉडी बनवणं सुरू करतो. त्यामुळे ज्या भागात अँटी बॉडीज वाढतात त्या भागातील मेलॅनिन कमी होत जातं. त्यामुळे त्या भागातील त्वचा तीचा मूळ रंग गमावत जाते व तो भाग पांढरा पडतो.
(अद्याप याबाबत अधिकृत किंवा ठोस माहिती समोर आलेली नाही)
























































