प्रासंगिक – चालकाच्या चुकीमुळेच बहुतांश अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या काही दिवसांत उद्योगपती, लोकप्रतिनिधींपासून सर्वसामान्यांच्या आणि भाविकांच्या वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे अपघात कमी करण्यासाठी राज्यात सध्या 11 ते 17 जानेवारी याकाळात रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव(रस्ते) सदाशिव साळुंखे यांच्याशी केलेला संवाद…

1. रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे, यामागील प्रमुख कारणे कोणती?
रस्ते अपघातांच्या मागे चालकाची चूक हे सर्वात मोठे कारण आहे. त्यानंतरचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे वाहनातील त्रुटी. रस्त्यांमधील त्रुटी हेही एक कारण आहे. पण त्याचे प्रमाण तीन ते चार टक्के आहे. मद्यप्राशन करून गाडी चालवणे, गाडी चालवण्याची सवय नसणे, वाहतूक नियमांची कल्पना नसणे आणि पुरेशी विश्रांती न घेता सतत ड्रायव्हिंग करणे अशी काही प्रमुख कारणेही आहेत.

2. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱयांना पायबंद कसा घालणार?
मुंबई-पुणे एक्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा घालून दिलेली आहे. वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होऊ नये म्हणून एमएसआरडीसीच्यावतीने चांगले प्रयत्न सुरू आहेत. वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गावर ऑटोमॅटिक स्पीड कंट्रोल सिस्टम लावण्यात येणार आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांना त्वरित रोखता येईल. त्याशिवाय महामार्गावर पोलिसांची गस्त तसेच स्पीड गन लावण्यात येतात.

3. वाढते रस्ते अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत?
रस्ते अपघात कमी करण्यासाठी सध्या सुरक्षा सप्ताह सुरू आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती पुस्तिका वितरित केल्या जात आहेत. खास करून शालेय विद्यार्थ्यांनाही याचे वाटप केले जात आहे. डॉक्टरांमार्फत चालकांच्या डोळ्यांची तपासणी होत आहे. जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर समित्याही स्थापन केल्या आहेत. यामध्ये रस्ते विभागाशी संबंधित तज्ञ, पोलिस, शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद व परिवहन विभागातील अधिकाऱयांचा समावेश आहे. या समितीमधील सदस्यांच्या वेळोवेळी बैठका होतील. रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्त्यातील धोकादायक ठिकाणे, ब्लॅकस्पॉटबाबत या समिती सरकारला सूचना करतील. या सूचना व त्यावरचे उपाय सुचवून प्रत्येक संबंधित विभागाला पाठवण्यात येतील. सरकार हे उपाय अतिशय गांभीर्याने करीत आहे.