लातूर जिल्ह्यातील 30 गावांची ड्रोनद्वारे पीक पेऱ्याची माहिती संकलित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर 

लातूर जिल्ह्यातील 30 गावातील पीक पेऱ्याची माहिती प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन द्वारे केली जाणार आहे. 23 जानेवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधीत हे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यासंदर्भात माहिती देताना त्याने सांगितले की, “सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे. ऊसाचे क्षेत्र कमी झाल्यानंतर त्याची जागा कांद्याने घेतली, मात्र अचूक पीक पेरा नसल्याने उत्पादनाचा अंदाज आला नाही. स्कायमेट या कंपनीच्या माध्यमातून 23 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील 30 गावांमधील पीक पेरा सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. लातूर तालुक्यातील सहा गावे निलंगा तालुक्यातील सहा गावे आणि औसा तालुक्यातील 18 गावांचा त्यामध्ये समावेश आहे.”

सध्या पीक पेरा हा तलाठ्यामार्फत संकलित केला जातो. मात्र तो अचूक होत नाही. त्यामुळे शासनाने कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा समावेश पीक पेरा नोंदीसाठी केला असून या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक म्हणून 20 गुण यामुळे मिळणार आहेत. यासोबतच ड्रोनच्या माध्यमातून पीक पेरा नोंदी करण्यात आल्या तर पेरणीचा अचूक अंदाज प्राप्त होईल. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे पाशा पटेल यांनी संगितले.