राजकीय दबावामुळे माझे निमंत्रण रद्द केले, नयनतारांचा पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लेखिका नयनतारा सहगल यांचे यवतमाळ साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्यामागचा खरा सूत्रधार कोण, याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. अशातच महाराष्ट्र सरकारच्या राजकीय दबावामुळेच माझे निमंत्रण रद्द झाले, असा सणसणीत आरोप आज सहगल यांनी करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे वादात सरकारला गोवू नका, संमेलनाच्या कुठल्याच निर्णयात सरकारचा समावेश नसतो, असे सोमवारी ठणकावून सांगणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री तोंडघशी पडले आहेत.

11 जानेवारीपासून सुरू होणाऱया 92 व्या साहित्य संमेलनापूर्वी रंगलेल्या निमंत्रण नाटय़ात तासागणिक नवे प्रयोग समोर येत आहेत. आयोजक आणि महामंडळाने एकमेकांकडे बोट दाखवणे सुरूच ठेवले आहे. त्यातच आता सहगल यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच बोट दाखवले आहे. आयोजकांना माझे विचार, माझी मतं आणि माझे लेखन याविषयी माहिती होते. त्यांनी मोठय़ा आनंदाने मला संमेलनाला निमंत्रित केले होते. मी येण्याच्या तयारीत होते, पण अचानक 6 जानेवारीला निमंत्रण रद्द केल्याचे आयोजकांचे चार ओळींचे पत्र आले. आयोजकांवर महाराष्ट्र सरकारने राजकीय दबाव टाकला, असे स्पष्ट मत सहगल यांनी व्यक्त केले.