
विनाक्रमांकाच्या डंपरने पोलिसांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा जाब विचारायला गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना डंपरचालक व मालकाने जबर मारहाण केल्याची घटना नगर शहरातील चितळे रोडवर घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेतील हेड कॉन्स्टेबल विजयकुमार बाळासाहेब वेठेकर व बबन विठ्ठल मखरे अशी जखमींची नावे आहेत. डंपरचालक गणेश शेषराव नागरे (रा. गाडगीळ पटांगण, नालेगाव), मालक अरुण भानुदास ढाकणे (रा. गणेशनगर, कल्याण रोड) यांच्यासह मालकाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेठेकर व मखरे हे गुरुवारी (दि. 12) कामानिमित्त चितळे रोडवर असलेल्या मोबाईलच्या दुकानात गेले होते. त्या दुकानाच्या बाजूलाच एका इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्या बांधकामासाठी एका विनाक्रमांकाच्या डंपरचालकाने रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसलेले हेड कॉन्स्टेबल मखरे यांच्या गाडीला धडक दिली. याचा जाब विचारला असता, या तिघांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.



























































