
नाशिक शहरासह सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी व निफाड तालुक्यातील काही भागात शनिवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मेरीतील भूकंपमापन केंद्रावर 4.1 रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
सुरगाणा, पेठ, दिंडोरी व कळवण तालुक्यात 25 जुलैपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्याची तीव्रता 2.9 ते 3.6 रिश्टर स्केल दरम्यान होती. सुरगाणा तालुक्यातील राशा व चिखली येथील जमिनींना मोठमोठय़ा भेगा पडल्या, तर माळेगावला भूस्खलनही झाले होते.
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास नाशिक शहरातील मखमलाबाद, म्हसरूळ, गंगापूर, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळाली पॅम्पसह सर्वच भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पंचवटी परिसरातील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये असलेल्या नागरिकांना ही पंपने जाणवल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुरगाणा तालुक्यातील मनखेड, चिकाडी, बाऱहे, भोरमाळ, मानी, जाहुले, बुबळी, वरंभे, पाटे, माळेगाव, तिर्ढे, उस्थळे, शिवशेत, म्हसगण, दाभाडी, जोगमोडी, गोंदे, करंजूल, आमदा, बोरगाव, अलंगुण, अंबोडे, खोकर विहीर, जांभूळपाडा, खोकरी, हतगड, शिंदे, काठीपाडा, नागशेवडी, ठाणगाव येथे रात्री भूकंपामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. भदर व सराड येथील घरांना तडे गेले.
पेठ तालुक्यातील करंजाळी, खोकरतळे, कोहोर, कुळवंडी, मौजे आड, मौजे बुद्रुक, खुर्द, भायगाव, हातरुंडी, बोरवट, तर चांदवड तालुक्यातील धोडांबे, वडनेरभैरव, खडकजाम, कानमंडाळे, भाटगाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती संबंधित तहसील कार्यालयांनी दिली. दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथील रमाकांत शार्दुल व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माळेदुमाला येथील चंद्रकांत घुगे यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत.
कळवणसह तालुक्यातील साकोरे, गणोरे, नरुळ, मानूर, जिरवाडे, करंभेळ, मोकभणगी, देसराणे, शिरसमणी, भुसणी, दह्याने, कनाशी, पिंगळे बुद्रुक, काठरे दिगर, गोसराने, पळसदर, नांदुरी, लखानी, विसापूर, भादवन, पिळकोस, देवळीवणी, ओझर, ओतूर, चणकापूर, देसगाव, बैदीपाडा, सरले दिगर, तिर्हळ खुर्द, तिर्हळ बुद्रुक, दळवट या भागांतही रात्री दहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रावरील नोंदीनुसार याची तीव्रता 4.3, तर मेरी येथील प्राप्त माहितीनुसार 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली पाच किलोमीटर खोलीवर असून, गुजरात राज्यातील हतगड डोंगररांगांजवळ भनवड येथे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिह्यात कुठल्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. आवश्यकता भासल्यास जवळचे तहसील किंवा ग्रामपंचायत कार्यालय अथवा पोलीस पाटील, तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
धरणांना कोणताही धोका नाही
भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून करंजवण 22, ओझरखेड 34 व वाघाड धरण 35 किलोमीटरवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजून दुसऱ्या धक्क्याची शक्यता वर्तवली गेल्याने पालखेड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व धरणांची पाहणी करण्यात आली. करंजवण, पालखेड, ओझरखेड, वाघाड, तिसगाव व पुणेगाव या धरणांना कोणताही धोका नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.



























































