कल्याण-मुरबाड मार्गावर मृत्यूचे तांडव; प्रवासी कोंबलेल्या इको टॅक्सीची सिमेंट मिक्सरला धडक; 11 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलाजवळ आज सकाळी अक्षरशः मृत्यूने तांडव घातले. कल्याणहून मुरबाडकडे खच्चून प्रवाशी भरून नेणाऱ्या भरधाव इको टॅक्सीने समोरून आलेल्या सिमेंट मिक्सरला प्रचंड वेगाने धडक दिली. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात टॅक्सीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. टॅक्सीतील सर्व अकरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. प्रवाशांचे मृतदेह रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. काळजाचा थरकाप उडवणारे हे दृश्य पाहून मदतीला धावलेले ग्रामस्थही हादरून गेले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

मृतांची नावे

प्रशांत ऊर्फ बबलू चंदने (21, देवगाव – मुरबाड), 2. भूषण घोरपडे (49, अंधेरी – मुंबई), 3. जिजा पेंबारी (50, टेंभरे – मुरबाड), 4. अनंता पवार (साखरे – मुरबाड), 5. दीपक गवळी (कल्याण), 6. गणपत मधे (32, देवराळवाडी – मुरबाड), 7. स्नेहा मोहपे (22, पर्हे – मुरबाड), 8. मानसी मोहपे (20, पर्हे – मुरबाड), 9. प्रथमेश मोहपे (17, पर्हे – मुरबाड), 10. रिंकू लोधा (30, इंदोर – मध्य प्रदेश). उर्वरित एकाची ओळख पटलेली नाही.