Beed News – ‘सामना’चा इफेक्ट! बंगळुरूला मागे टाकत बीड बनलं देशाचं टॉप रेशीम हब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याने आता रेशीम क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. नुकतेच ‘सामना’मध्ये बीड रेशीम हब बनत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच बीडने थेट बंगळुरूच्या बाजारपेठेलाही मागे टाकत देशातील अव्वल रेशीम बाजारपेठ म्हणून किमया साधली आहे.

गेल्या दोन दिवसांत बीड कृषी उत्पन्न बाजार समितीतील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात तब्बल 68 हजार किलो रेशीम कोषांची विक्रमी आवक झाली. सोमवारी सुमारे 35 हजार किलो, तर बुधवारी 32 हजार किलोहून अधिक रेशीम आवक नोंदवण्यात आली. ही कामगिरी देशात सर्वाधिक ठरली आहे. विशेष म्हणजे, 13 एप्रिल रोजी आशिया खंडातील सर्वात मोठ्या रामनगर मार्केटपेक्षा तब्बल 10 हजार किलो अधिक रेशीम आवक बीडमध्ये झाली होती. त्यामुळे बीडच्या बाजारपेठेने राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधले आहे.

बीडच्या या बाजारपेठेत राज्यभरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर रेशीम विक्रीसाठी येत आहेत. जळगाव, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, वाशीम, धुळे, नागपूर, वर्धा तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून शेतकरी येथे आपला माल घेऊन येतात.

या यशामागे बाजार समितीच्या संचालक मंडळाची एकजूट, प्रशासनाचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. संचालक धनंजय गुंदेकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेला विश्वास आणि राज्य सरकारच्या रेशीम विकास योजनांमुळे बीडमध्ये रेशीम उत्पादन व आवक येत्या काळात आणखी वाढणार आहे. आज बीड केवळ जिल्हा न राहता “देशाचं रेशीम हब” म्हणून ओळख निर्माण करत आहे, ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरत आहे.