अर्थवृत्त – स्विस बँकेतील पैशांत अचानक घसरण; विदेशातील ब्लॅक मनी व्हाईट?

स्विस बँकेचे नाव घेतल्यानंतर सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो ब्लॅक मनी. हिंदुस्थानातील काही जण अवैध मार्गाने जमवलेला काळा पैसा स्विस बँकेत ठेवतात, असे सांगितले जाते, परंतु आता अचानक स्विस बँकेतील हिंदुस्थानी लोकांचा पैसा कमी होत आहे. त्यामुळे स्विस बँकेतील काळा पैसा व्हाईट करण्यात आलाय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. स्विस बँकेमध्ये हिंदुस्थानातील मूठभर लोकांनी ठेवलेला काळा पैसा चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. सेंट्रल बँक ऑफ स्वित्झर्लंडच्या मते गेल्या वर्षी 2023 मध्ये या फंडमध्ये 70 टक्के घट झाली आणि 1.04 अब्ज स्विस फ्रँक (अंदाजे 9,771 कोटी रुपये) इतका राहिला असून तो गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी आहे. हिंदुस्थानी लोक आता स्विस बँकेत पैसे जमा करत नसून ज्यांनी याआधी पैसे जमा केले तेदेखील बँकेतून पैसे काढून घेत आहेत. स्विस नॅशनल बँकेच्या अहवालानुसार आता स्विस बँकेत हिंदुस्थानींचा पैसा 103.98 कोटी स्विस फ्रँक शिल्लक आहे.

हिंदुस्तानींनी स्विस बँकेत 427 दशलक्ष स्विस फ्रँक जमा केले होते. जो एक वर्षापूर्वी 24 दशलक्ष स्विस फ्रँक होता. 2017, 2020 आणि 2021 वगळता स्विस बँकेत भारतीयांचा जमा असलेला पैसा सातत्याने कमी होत असल्याचेही बँकेने अहवालात म्हटले.

स्कायडेक रेजिडेंस

पॅराडाइम रियल्टीने स्कायडेक रेजिडेंस हा प्रकल्प सादर केला. हा टाऊनशिप प्रकल्प ओशिवराजवळ स्थित आहे. स्कायडेक रेजिडेंसमध्ये व्यायामशाळा, पूल, सलून आणि स्पा सह चाळीसहून अत्याधुनिक अधिक सुविधा आहेत.

ऍडवान्टेक व्हील्सचा करार

ऍडवान्टेक व्हील्सने मल्टिप्लेक्सेस सिनेमा चेन पीव्हीआरसोबत करार केला. याअंतर्गत आठ ठिकाणी पीव्हीआर कॉम्प्लेक्सेसना भेट देणाऱया ग्राहकांना प्रीमियम फ्लो-फोर्ज्ड अलॉई व्हील्सची विशेष श्रेणी पाहता येईल.

झोमॅटोचा वर्ल्ड रेकॉर्ड

4300 हून अधिक वितरण भागीदार जगातील सर्वात मोठय़ा प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एका छताखाली एकत्र आणण्याचे काम झोमॅटोने केले असून याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. झोमॅटोने आपल्या डिलिव्हरी पार्टनर्ससोबत मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

सेल्सफोर्सचा नवा विभाग

सेल्सफोर्स इंडियाने सार्वजनिक क्षेत्रातील विभाग सुरू करण्याची घोषणा केली. या वेळी कंपनीच्या सीईओ अरुंधती भट्टाचार्य, अरुण कुमार परमेश्वरन उपस्थित होते. सरकारी संस्था-सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना सक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे, असे अरुंधती म्हणाल्या.

शेअर बाजाराला अखेर ‘ब्रेक’

शेअर बाजाराला शुक्रवारी ब्रेक लागला. सेन्सेक्स 269 अंकाच्या घसरणीसोबत 77,209 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 65 अंकाच्या घसरणीसह 23,501 अंकावर बंद झाला. सकाळी बाजार उघडल्यानंतर बाजारात उसळी पाहायला मिळाली. मिडकॅप शेअर बाजारात आज संपूर्ण दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाला. ग्राँऊल्स इंडिया, पीव्हीआर आयनॉक्स आणि हेवेल्स इंडिया यांच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली, तर चंबल फर्ट, कोरोमंडल इंटरनॅशनल, बालकृष्ण इंडस्ट्रीज आणि मॅरिको शेअर्समध्ये घसरण झाली.

बुगाटीची हायब्रिड कार सादर

बुगाटी कंपनीची पहिली हायब्रिड कार बुगाटी टूरबिलन सादर करण्यात आली. ही कार केवळ 2 सेकंदांत शून्य ते 96 चा वेग पकडू शकते. कारचा टॉप स्पीड 445 किलोमीटर प्रतितास आहे. या कारची सध्या टेस्टिंग सुरू आहे. या कारची डिलिव्हरी 2026 पासून सुरू होईल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. या कारमध्ये 813 लिटरचे इंजिन देण्यात आले. या कारमध्ये 3 इलेक्ट्रिक मोटर देण्यात आल्या आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 34 कोटी रुपये आहे.

महाराजा कंपनीची नवी अगरबत्ती

महाराजा अगरबत्ती कंपनीने मिस्टिक मस्क आणि प्रार्थना प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. या अगरबत्तीच्या मनमोहक सुगंधाने देवाची प्रार्थना करताना मन अगदी प्रसन्न राहते. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. महाराजा कंपनीची अगरबत्ती खरेदी करताना कंपनीचा लोगो पाहून खरेदी करावी असे कंपनीने म्हटले आहे. संपर्क –  8369185071.

स्टार्टअपसाठी 230 दशलक्ष डॉलर्स

ऍमेझॉन वेब सर्व्हिसेसने जनरेटिव्ह एआय स्टार्टअप्ससाठी 230 दशलक्ष यूएस डॉलरची घोषणा केली. 80 संस्थापक आणि नवोदितांना (आशिया-पॅसिफिक आणि जपानमधील -एपीजे- 20) स्टार्टअप्सना या क्षेत्रात आणण्याचे उद्दिष्ट आहे, असे स्टार्टअप इकोसिस्टमचे प्रमुख अमिताभ नागपाल यांनी सांगितले. कंपनी या प्रदेशातील जनरेटिव्ह एआय स्पॉटलाइट प्रोग्रामअंतर्गत 120 प्री-सीड आणि सीड-स्टेज रेडी स्टार्टअप्स निवडेल, असेही ते म्हणाले.

सोने 73 हजार, तर चांदी 94 हजारपार

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली. सोन्याचा भाव 810 रुपयांनी वाढून 10 ग्रॅमसाठी 73 हजार 250 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव प्रतिकिलोसाठी 1500 रुपयांनी वाढून 94 हजार रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सोने प्रति 10 ग्रॅमसाठी 63,870 रुपये होते, तर चांदी 72,160 रुपये प्रतिकिलोपर्यंत होती.