चीनला दिला आणखी एक झटका, ‘ईकोसॉक’ सदस्यपदी हिंदुस्थानची निवड

364

विस्तारवादी चीनला हिंदुस्थानने आणखी एक झटका दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC)ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून हिंदुस्थानची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. हिंदुस्थान, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. हिंदुस्थानचा या समितीवरील कार्यकाळ 2021 ते 2025 असा 4 वर्षांचा असेल.

संयुक्त राष्ट्रांतील इकॉसॉकच्या महिलाविषयक समिती सदस्य निवडणुकीत 54 देशांनी मतदानात सहभाग घेतला होता.हिंदुस्थानला मतदानात सर्वाधिक मते मिळाली.चीनला एकूण मतांच्या निम्मीही मते मिळवता आली नाही.

समानता, महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणार – गुरुमूर्ती
जगात लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदुस्थान कटिबद्ध असेल. त्यासाठी जगभरात चालणाऱया कार्याला आमचे महत्त्वपूर्ण समर्थन असेल. आम्ही सदस्य देशांनी आम्हला निवडणुकीत समर्थन दिल्याबद्दल हिंदुस्थानच्या वतीने मी धन्यवाद देतो,’ अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी निवडणुकीच्या निकालानंतर व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या