
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची खाती असलेल्या कापशी येथील शाखा आणि गडहिंग्लजमधील हरळी बुद्रूक येथील शाखेतही ईडीने आज छापा टाकल्याने जिह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. रात्री उशिरापर्यंत बँकेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती. दरम्यान, ईडीच्या या छाप्यामुळे बँकेच्या दैनंदिन कामासाठी येणाऱया ग्राहकांना त्रास होऊ लागल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी तसेच पोलिसांत जोरदार वादावादीचे प्रकार घडले. परिणामी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानासह समर्थकांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, पुण्यातील निवासस्थान तसेच मुलीच्या घरी 11 जानेवारी रोजी ईडीच्या पथकाने एकाचवेळी छापे टाकले होते. सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत तब्बल 12 तास ही तपासणी सुरू होती. ईडीच्या या छापेमारीनंतर वातावरण शांत झाले असतानाच 20 दिवसांनंतर ईडीने पुन्हा मुश्रीफ यांना टार्गेट केले.
आज सकाळी अकराच्या सुमारास ईडीचे सात ते आठ अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहुपुरी येथील मुख्य कार्यालयात पोहचले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ग्रामीण भागातून बँकेच्या कामासाठी आलेल्या शेतकरी सभासदांची अडवणूक होत असल्याने बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांशी वादावादीचे प्रकार घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांच्या कक्षात ईडीच्या अधिकाऱयांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली. या मजल्यावर बंदोबस्त ठेवून बँकेतील अन्य व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यात आले.
यापाठोपाठ जिल्हा बँकेच्या गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रूक येथील साखर कारखान्याजवळ असणाऱया जिल्हा बँकेच्या शाखेवरदेखील छापा टाकत चौकशीचे सत्र सायंकाळी उशिरापर्यंत सुरू ठेवले होते. जवळपास पाच ते सहा अधिकाऱयांच्या या पथकाने चौकशी व तपासणी केली. या कारवाईवेळी या ठिकाणी येणाऱया-जाणाऱयांना मज्जाव करण्यात आला. या कारवाईवेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले होते.



























































