
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट नाव घेऊन आरोप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर उत्तर दिले आहे. माझ्यामध्ये खूप संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही. मनीष भंगाळे प्रकरणात नाही, तर खडसेंना एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला, असा पलटवार फडणवीस यांनी केला.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ‘आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लीनर होते. आरोप झाला की क्लीन चिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,’ या खडसेंच्या आरोपाबाबत विचारले असता फडणवीस यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावले. ते ज्या मनीष भंगाळेबाबत बोलत आहेत त्या प्रकरणात खडसेंना क्लीन चिट आहे. भंगाळेने आरोप लावल्यावर मी स्वतः कमिटी तयार करून 12 तासांत रिपोर्ट द्यायला लावला. भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकले. कित्येक दिवस तो जेलमध्ये असल्याचे स्पष्ट केले.
बायको वा जावयाने व्यवहार केला तर मी दोषी कसा?
फडणवीसांपेक्षा मी संयमी आहे. एमआयडीसी प्रकरणात राजीनामा घेतला, तर कुठल्या कारणासाठी? ती जमीन मी खरेदी केलेली नाही. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील तर मी दोषी कसा? अमृता यांनी व्यवहार केला तर तो काय फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का, असा सवाल खडसे यांनी केला.
न्यायालयाच्या आदेशाने खडसेंवर गुन्हा दाखल
खडसे कुटुंबाने जमीन घेतली आणि त्यांनी यासंदर्भातील बैठका घेतल्या. आरोप झाला त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याकर मी स्वतः त्यात न्यायाधीशांची कमिटी नेमली. रिपोर्ट येण्याआधीच लोक उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तो मी आकसापोटी दाखल केला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.





























































