
चंदगड तालुक्यातील कोदाळी, धनगरवाडय़ावरून माडवळे गावाजवळील पार्शी वाडय़ाच्या परिसरात बुधवारी रात्री पाच हत्तींचा कळप आला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी हत्तीच्या कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिथरलेल्या हत्तींनी उसाच्या शेतीची मोठय़ा प्रमाणावर नासधूस केली. त्यानंतर हा कळप पुढे हाजगोळी मार्गाने कर्नाटक हद्दीत निघून गेला.
नारायण वैजू गावडे व वनरक्षक प्रकाश शिंदे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. अथर्व-दौलत साखर कारखान्याचे शेतीगट अधिकारी यांनी नुकसान केलेल्या उसाची पाहणी केली. यावेळी नेमाणा गावडे, सुरेश पार्शी, जोतिबा गावडे, संतोष गावडे, गणपत पवार, रवळू गावडे, शिवराज दळवी, मारुती मसूरकर, गोविंद पार्शी, शेतकरी उपस्थित होते.
पाटणे वन विभागाच्या हद्दीत हत्तींचा वावर कायम असून कोदाळी, धनगरवाडा, जंगमहट्टी, माडवळे, पार्शीवाडा, हाजगोळी मार्गे कर्नाटक हद्दीत असा त्यांचा मार्ग आहे. त्यामुळे दरवर्षी हा कळप या परिसरात येतो. मात्र, अशावेळी ग्रामस्थांनी त्यांना त्यांच्या मार्गे जाऊ द्यावे, जेणेकरून नुकसान कमी होईल. या कळपाला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात हा कळप अधिक बिथरतो आणि आसपासच्या शेताचे नुकसान करतो. त्यामुळे शेतकऱयांनी संयम ठेवून हत्तींना आपल्या मार्गाने जाऊ द्यावे, असे आवाहन चंदगड वन विभागाकडून करण्यात आला आहे.





























































