श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवले

पंढरपूर कॉरिडॉर व विकास आराखडय़ाला व्यापारी व नागरिकांचा तीव्र विरोध होत असताना, प्रशासनाने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरातील अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन करीत मंदिर परिसरातील पश्चिमद्वार ते चौफळा- छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच नामदेव पायरी ते महाद्वार चौकी तसेच दक्षिण व उत्तरद्वार परिसरातील 5 ते 10 फुटांपर्यंत केलेले अतिक्रमण व्यापाऱयांनी काढून घ्यायला सुरुवात केली आहे. अतिक्रमण काढण्यात आल्याने नेहमी गजबजलेला मंदिर परिसर मोकळा वाटत असून, भाविकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

रोज हजारो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता पंढरपुरात येतात. भाविक प्रासादिक साहित्याची खरेदी करतात. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी होते. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याबाबत आवाहन केले होते. याकरिता सदर भागात रिक्षाद्वारे व्यापारी, अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात येत होत्या. त्यानुसार सोमवारपर्यंत अतिक्रमण काढून घ्यावे; अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे व्यापाऱयांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले.

कॉरिडॉरला विरोध, तर ‘अतिक्रमण हटाव’ला प्रतिसाद
मंदिर परिसरात माउली कॉरिडॉर राबवण्यात येणार आहे. यामध्ये हजारो आस्थापना बाधित होणार आहेत. त्यामुळे याला विरोध होत आहे. कॉरिडॉर रद्द करा; अन्यथा कर्नाटकात सामील करण्याचा इशारा देत आहेत. एकीकडे कॉरिडॉरला विरोध होत असताना दुसरीकडे प्रशासनाने ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम सुरू केल्याने कॉरिडॉरला विरोध करणारे व्यापारी, नागरिक स्वतःहून अतिक्रमणे काढून घेत आहेत.

पंढरपूर विकास आराखडय़ाबाबत चार दिवसांत मुंबई येथे बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शहरातील इतर भागांतही ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबवण्यात येणार आहे.
– अरविंद माळी, मुख्याधिकारी, पंढरपूर.