सोनिया गांधी यांची ईडीकडून 3 तास चौकशी, 25 जुलैला पुन्हा हजर राहण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सुमारे तीन तास चौकशी केली. याच प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जे प्रश्न विचारले गेले तेच सोनिया गांधी यांनाही विचारण्यात आले. ईडीने त्यासाठी 50 प्रश्नांची यादी बनवली होती. सोनिया गांधी यांना पुन्हा 25 जुलै रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांची चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 50 प्रश्न विचारून झाल्यानंतर ईडीने सोनिया यांना घरी जाण्यास परवानगी दिली. त्यावर सोनिया गांधी यांनी आपण रात्री 8-9 वाजेपर्यंत थांबण्यास तयार आहोत, तुम्हाला जे विचारायचे आहे ते विचारा असे ईडीच्या अधिकाऱयांना सांगितल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.

सोनिया गांधी या मध्यंतरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होत्या. त्यामुळे आज चौकशीदरम्यान ईडीने दोन डॉक्टर आणि रुग्णवाहिका तयार ठेवली होती. त्याचप्रमाणे प्रियांका गांधी यांनाही ईडी कार्यालयात प्रवेश दिला होता. चौकशीदरम्यान दोन वेळा भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. चौकशीवेळी कार्यालयात उपस्थित राहणाऱया प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱयाला कोविड निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खरगे, थरूर यांच्यासह काँग्रेसचे 75 खासदार ताब्यात

काँग्रेस नेते आणि खासदारांनी दिल्लीतील अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयापासून संसदेपर्यंत मोर्चा काढून भाजपविरोधी घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार शशी थरूर यांच्यासह 75 खासदारांना ताब्यात घेतले.

सोनिया गांधींना बदनाम करण्यासाठी कारवाई – मल्लिकार्जुन खरगे

सोनिया गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मात्र यानंतरही काँग्रेस घाबरणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भाजपवाले गांधीजींच्या मार्गावर चालणारे नाहीत तर गोडसेच्या मार्गावर चालणारे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेससह विरोधी पक्षांकडून देशभरात निषेध; हजारो कार्यकर्त्यांना अटक

सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलने केली. देशभरात हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही जनहितविरोधी मोदी सरकारविरुद्ध लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकार आपल्या राजकीय विरोधकांविरुद्ध केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे असा आरोप त्यांनी केली. मोदी सरकारविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.