हॉटेलमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये पहाटे सव्वाचार वाजता घडली. या हल्लेखोरांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात हॉटेलमधील घटना घेतले आहे.
गुरुगोविंदसिंगपुरा परिसरातील राजज्योती बिल्डिंगमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सॉफ्टवेअर इंजिनिअर संतोष राजू पेट्टे (२८, मूळगाव हैद्राबाद, तेलंगणा) राहतो. संतोष याचे बीटेकपर्यंत शिक्षण झाले असून सध्या एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून वर्क फ्राम होम करतो. त्याच्या वडिलांची रोपळेकर चौकात न्युट्रीव्हाइट नावाची दुध डेअरी आहे.
संतोषचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हे काम आटोपल्यानंतर संतोष हा त्याच्या चालकासह झाल्टा फाटा येथे जेवणासाठी गेला होता. दरम्यान, संतोष पेट्टे हा हॉटेलमध्ये पोहचला त्यावेळेस हॉटेलमध्ये ग्राहक व हॉटेलचे कर्मचारी यांच्यात बिल देण्यावरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच संतोष पेट्टी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहक व वेटर हे दोघेही अक्रमक होते. त्यामुळे संतोषच्या कारचालकाने संतोष पेट्टे यास मध्ये न पडण्याचा सल्ला दिला. मात्र, संतोषने चालकाकडे दुर्लक्ष करून हाणामारी सोडविण्यासाठी पुढे गेला. त्यामुळे वेटरसोबत भांडण करणाऱ्यापैकी एकाने थेट संतोषवर हल्ला करून चाकूने भोसकले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोषला पाहून हल्लेखोर तरुण पसार झाले. दरम्यान, या घटनेची माहिती चिकलठाणा पोलिसांना कळविली. माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्यासह पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
संतोषच्या छातीत चाकू खुपसल्यानंतर तो खाली कोसळल्याचे पाहून मारेकरी तेथून त्यांच्या चारचाकीत बसून पसार झाले. संतोषच्या वाहनाचा चालक राधेशाम अशोक गडधे परिसरातील नागरिकांकडे मदतीसाठी मागणी करत होता. परंतु त्याला कोणीच मदत केली नाही. शेवटी राधेशाम याने रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या संतोषला स्वतः त्यांच्या चारचाकीमध्ये बसवून खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला घाटीत दाखल केले.