
सामना प्रतिनिधी । खेड
लोटे औद्योगिक वसाहत हे काँग्रेसचे पाप आहे मात्र तरीही काही लोकप्रतिनिधी स्वर्थापोटी लोटे औद्योगिक वसाहतीच्या प्रदुषणाबाबत माझ्या नावाने शिमगा करत स्वतःचे स्थार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे मी खपवून घेणार नाही. माझ्यावर आरोप करण्याआधी आरोप करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान पर्यावरण खात्याच्या नावाने शिमगा करण्यात आला होता. त्याचा निषेध करताना रामदास कदम बोलत होते.
आपल्या जामगे निवासस्थानी बोलताना ते म्हणाले, लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी पर्यावरण खाते आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. पूर्वी सामुदायिक सांडपाणी प्रकल्पामध्ये केवळ 6 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात होती. आता त्याची क्षमता 10 एमएलडी पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठी मी माझ्या खात्याकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. जे कारखाने प्रदुषणाबाबतचे नियम व निषक पाळत नाहीत अशा अनेक कंपन्यावर पर्यावरण खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. मी स्वतः मच्छिमारांचाही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मच्छिमार संघटनेला 50 लाखाची मदत मिळवून देण्यात आली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी जावून आंदोलन केले, पर्यावरण खात्याच्या नावाने शिमगा केला, त्या लोकप्रतिनिधीच्या अखत्यारीत लोटे औद्योगिक वसाहत हा भाग येतच नाही. तरीही आपण जनतेसाठी काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्यासाठी लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या आंदोलनाची नौटंकी करत आहेत. जर तेथील जनतेच्या तशा तक्रारी असतील तर स्वतःला जनतेचा कैवारी समजणाऱ्या लोकप्रतिनिधीने पर्यावरण खात्याचा मंत्री म्हणून माझ्याशी चर्चा करायला हवी होती. तरीही न्याय मिळाला नसता तर आंदोलन करायचे होते. मात्र आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरुन स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. स्वार्थासाठी आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनता निवडणुकी दरम्यान जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
आतापर्यंत कोकणाने अनेक आमदार पाहिले, मात्र असा आमदार आजपर्यंत पाहिला नव्हता. संजय कदम यांनी महागाई विरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान माझी बदनामी करण्यासाठी जे जे काही केले ते आमदार या शब्दाला काळीमा फासणारे होते. त्याचे उत्तर त्याला द्यावेच लागणार आहे. एका मंत्र्याची अशा प्रकारे बदनामी करणे किती महागात पडू शकते हे त्याला काही दिवसातच कळून येणार आहे. येत्या चार दिवसात मी त्याच्या विरोधात हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. या आधी एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे. आता पुन्हा तीच वेळ आली असल्याचे रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
































































