हाफीज सईदचा समर्थक अहमद वातलीची 1 कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दहशतवाद्यांचे आश्रयदाते, समर्थक यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेले कारवाईचे सत्र सुरूच आहे. लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि जमात-उर-दवाचा संस्थापक हाफीज सईद याचा कथित अर्थ पुरवठादार आणि समर्थक अहमद शाह वातली याची 1 कोटी 3 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. वातली हा जम्मू-कश्मीरमधील एक व्यावसायिक आहे.

वातलीविरोधात जम्मू-कश्मीर पोलिसांनी यापूर्वी अनेक गुन्हे दाखल केले आहेत, परंतु हिंदुस्थानमधील तपास संस्थेने त्याची मालमत्ता जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वातली हा निधी उभारण्यात सहभागी झाल्याचे आणि हुर्रियतच्या नेत्यांना आर्थिक रसद पुरवण्यात त्याचा हात असल्याचे आढळून आलेले आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटलेले आहे.

हिंदुस्थानविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप
पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर एजन्सी असलेल्या आयएसआय आणि नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त आणि दुबईमधील अज्ञात सूत्रांकडून वातलीस पैसे मिळालेले आहेत, असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटलेले आहे. हिंदुस्थानविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप वातली, हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन आणि इतर नऊ जणांवर एनआयएने ठेवलेला आहे.