ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात…सॅम पित्रोदा यांचा दावा; विरोधी पक्षांना गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी लोकसभा निवडणुका देशाचे भवितव्य ठरवणाऱया असतील. अशा वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक होण्याचा मुद्दा काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी गांभीर्याने घ्यायला हवा, असे तंत्रसल्लागार आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे. ईव्हीएम हॅक करता येतात, असा दावा त्यांनी केला.

ईव्हीएम हॅक होण्याच्या शक्यतेचा मुद्दा विरोधी पक्षांनी यापूर्वीही उपस्थित केला आहे. या शक्यतेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, अर्थातच ईव्हीएममध्ये हेराफेरी शक्य आहे. मुख्यत्वेकरून मतदार मतदान निश्चितीची यंत्रणा (व्हीव्हीपॅट) लावल्यामुळे मतदान यंत्रे एकमेकांशी जोडली जातात आणि हॅपिंग शक्य होते. निवडणुकीबाबत नागरिक आयोगाने दिलेला अहवाल वाचला की हा प्रश्न किती गंभीर आहे ते लक्षात येते. याच व्हीव्हीपीएटी सुविधेवर अविश्वास दर्शवणाऱया या अहवालावर 6,500 नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.

राहुल यांच्या अमेठी पराभवाचे कारण ईव्हीएमच

राहुल गांधी यांनाही ईव्हीएमबद्दल आक्षेप आहेत. मी त्यांच्याशी या विषयावर बोललो आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. अमेठीत राहुल यांच्या पराभवाचे कारणही ईव्हीएमच आहे, असे आमचे मत आहे, असे  पित्रोदा म्हणाले.

राम मंदिर की बेरोजगारी?

राम मंदिर स्थापनेला आपला विरोध नाही, पण देशापुढील खरे मुद्दे काय आहेत हे आता जनतेलाच ठरवावे लागेल. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे की बेरोजगारी आणि महागाई? याचा विचार लोकांनीच करायला हवा. धर्माचे पालन जरूर करावे, मात्र धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधानांवर टीका

जेव्हा देशाचे पंतप्रधान 10 वर्षे पत्रकार परिषद घेत नाहीत, मंदिरांत जास्त वेळ घालवतात हे त्रासदायक आहे.