
आगामी 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक मी लढवणार असून, तशी तयारी केली आहे. कोणीही ताम्रपट घेऊन भाजपमध्ये दाखल झालेला नाही, असा टोला आमदार राम शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला. लोकसभेच्या 2014 आणि 2019 निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो. मात्र, दोन्ही वेळेस पक्षाने माझ्यावर वेगळी जबाबदारी दिली. आता आगामी 2024ची निवडणूक लढवण्यास मी तयार असून, तशी तयारी केली आहे. यावेळी विखे यांच्या वादाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, वादाचा प्रश्न नाही. आम्ही आता फार पुढे गेलो आहोत. पक्षाने दिलेली जबाबदारी मी नेहमीच सक्षमपणे पार पाडतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, संग्राम जगताप यांना भाजपमध्ये घ्यावे, असे खासदार सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याचा शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘खासदार विखे यांनी विकासाच्या कामाचं जे काही आहे ते पाहावे आणि पक्षपातळीवरचे निर्णय आम्हाला घेऊ द्यावेत, असे आगरकर म्हणाले.































































