
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका माजी सरपंचासह त्याच्या कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे मृतदेह गाडीत ठेवून पेटवून देण्यात आले. या संपूर्ण हत्याकांडात धक्कादायक बाब म्हणजे, माजी सरपंचाच्या पहिल्या पत्नीने आपल्या दोन मुलांच्या मदतीने हा संपूर्ण कट रचून अत्यंत क्रूरपणे अंमलात आणल्याचे समजते.
अजमेर शहरापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीरामपुरा गावात ही घटना घडली. गावातील महामार्गावर, पीडितांच्या घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी जळालेल्या अवस्थेत आढळून आली. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते, मात्र पोलिसांनी तपास चक्र फिरवताच एका भयंकर हत्याकांडाचा खुलासा झाला. या हत्याकांडात रामसिंग चौधरी (माजी सरपंच), त्यांची आई पुसी देवी, दुसरी पत्नी सूर्यज्ञान देवी आणि पुतणी महिमा चौधरी यांची हत्या करण्यात आली आहे.
गाडीत तीन मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले, तर रामसिंग यांच्या दुसऱ्या पत्नी सूर्यज्ञान देवी यांचा मृतदेह जवळच असलेल्या शेतात आढळून आला. त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत रामसिंग यांची पहिली पत्नी सुनीता, मुलगी सरिता आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
रामसिंग यांचे पहिले लग्न 2005 मध्ये सुनीता यांच्याशी झाले होते त्यांना दोन मुले होती. तर 2019 मध्ये रामसिंग यांनी सुनीता यांच्या विरोधाला डावलून सूर्यज्ञान यांच्याशी दुसरा विवाह केला सूर्यज्ञान या जिल्हा परिषद सदस्या होत्या आणि कायद्याचे (Law) शिक्षण घेत होत्या. रामसिंग हे त्यांच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहत होते. यामुळे घरात सतत भांडणे होत असत.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
अजमेरचे पोलीस अधीक्षक हर्ष वर्धन अगरवाला यांनी सांगितले की, “सुरुवातीला ही केवळ गाडीला आग लागल्याची दुर्घटना वाटत होती. मात्र, प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आला. पोलीस जेव्हा रामसिंग यांच्या घरी पोहोचले, तेव्हा पहिली पत्नी सुनीता हिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रामसिंग यांच्या आईची तब्येत बिघडल्याने ते त्यांना रुग्णालयात घेऊन गेले आहेत, असा खोटा दावा तिने केला होता.” परंतु, पोलिसांनी सखोल तपास केला असता हा कौटुंबिक वादातून केलेला पूर्वनियोजित खून असल्याचा पर्दाफाश झाला. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींची चौकशी सुरू आहे.




























































