
सामना प्रतिनिधी । अलिबाग
समुद्रात सध्या मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने कोळी बांधवाच्या जाळ्यात मच्छी मिळत नसल्याने हात हलवत बोट घेऊन मागे फिरावे लागत आहे. तर अनेक कोळीवड्यात कोळी बांधवांनी बोटी किनाऱ्याला लावून ठेवल्या आहेत. मुंबई येथून पार्सलची आलेली मासळी मच्छी बाजारात मिळत आहे. मुंबई येथून आलेल्या पापलेट, सुरमई, कोळंबी मासळीला दरही जास्त असल्याने मच्छी खवय्यांच्या खिशाला आर्थिक चाट पडत आहे. तर काही ग्राहक ओला झवळा, सुकट, मांदेली यासारख्या छोट्या मच्छीवर आपली चव भागवत आहेत.
थंडीच्या दिवसात समुद्रात मच्छीची आवक कमी झालेली पाहायला मिळत आहे. या काळात भागांची भरती असल्याने मच्छिमारी साठी गेलेल्या बोटींना मच्छी जाळ्यात मिळत नाही. त्यामुळे छोट्या खाडी किनारी मिळणारी मच्छी मासळी बाजारात मिळत आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे येथून पार्सलची मच्छी मासळी बाजारात मिळत आहे. मात्र ही पार्सलची मच्छी असल्याने त्याला भावही जास्त आहे. त्यामुळे ग्राहकांना नेहमी पेक्षा जास्तीचा भाव देऊन मच्छी खरेदी करावी लागत आहे.
मासळी बाजारात पापलेट, सुरमई, कोळंबी, रावस, मांदेली, चिंबोरी, कालवे यासारखी मच्छी मिळत आहे. मात्र यातील पापलेट, सुरमई, कोळंबी, रावस यासारखी मोठी मासळी मुंबई येथून मुबलक येत असल्याने या मच्छीचा भाव वाढलेला आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्तीचा दर देऊन मोठी मच्छी खरेदी करावी लागत आहे. मच्छीची कमी झालेली आवक व वाढलेले मच्छीचे दर यामुळे खवय्ये सुकी मच्छी, ओला झवळा, मांदेली, चिंबोरी, कालवे यासारख्या मासळीवर आपल्या जिभेचे चोचले पुरवत आहेत.
थंडीच्या दिवसात मच्छी कमी मिळत आहे, त्यातच भागांची भरती असल्याने कोळी बांधव मच्छीमारीसाठी समुद्रात जात नाहीत. त्यामुळे अनेक कोळीवाड्याच्या समुद्र किनारी मच्छिमारी बोटी लागलेल्या दिसत आहेत. त्यामुळे अजून 10 ते 15 दिवस मच्छी खवय्यांना पार्सलची मच्छी खावी लागणार हे मात्र नक्की.



























































